महापालिकेचा ‘एलऍण्डटी’ दणका! साडेआठ लाखांचा दंड

0
290

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – अत्यावश्‍यक काम असल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीत कामे करणाऱ्या लॉर्सन ऍण्ड टुब्रो (एल ऍण्ड टी) कंपनीला अटी-शर्तीसह पावसाळ्यातही खोदाईस परवानगी दिली; मात्र कंपनीने अटींचे उल्लंघन केले. त्यामुळे कंपनीवर गेल्या अडीच वर्षांमध्ये 8 लाख 40 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीची विविध भागात कामे सुरु आहेत. एल ऍन्ड टी कंपनीसोबत 25 जानेवारी 2019 रोजी करारनामा झाला असून त्यांना कामाचा आदेश देण्यात आला आहे. सिटी फायबर नेटवर्क फॉर कोअर, ऍग्रीशन ऍण्ड ऍक्‍सेस लेअर, वायफाय, सीसीटीव्ही, पोल बसविण्याचे नियोजन आहे. या कामासाठी रस्ता व फुटपाथ खोदाई करावी लागणार होती. कोअर (गाभा) आणि ऍग्रीशनसाठी (एकत्रीकरण) करण्यात येणाऱ्या रस्ता खोदाईस पावसाळ्यातही परवानगी देण्यात आली आहे.

शहरामध्ये सुरू असलेल्या खोदकामाची क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने वारंवार पाहणी करण्यात आली. त्यावेळी अटी शर्तीनुसार काम करण्यात येत नसल्याचे आढळून आले. तसेच खोदकाम केल्यानंतर रस्ता व्यवस्थित न बुजवणे, त्याची वेळेत दुरुस्ती न करणे अशा बाबी आढळल्या आहेत. त्यामुळे एल अँड टी या कंपनीला 2022-21 या वर्षी 5 लाख, 21-22 या वर्षी 3 लाख तर या वर्षी 40 हजार रुपये असा दंड आकारण्यात आला आहे.

”खोदकाम करून वेळेत रस्ता न बुजवणे तसेच निविदेतील अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे एल अँड टी या कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावर्षी या कंपनीवर 40 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. तर यापूर्वी कंपनीने अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे” कार्यकारी अभियंता मनोज सेठीया यांनी सांगितले.