पिंपरी, दि. ८ –
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे, तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहभागातून पार पडलेल्या ‘पालखी सोहळा २०२५’ दरम्यान, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन व समाजजागृती या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, नगर सचिव मुकेश कोळप, आरोग्य विभागाचे उप आयुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, तसेच इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ११ सेवाभावी संस्थांना सन्मानपत्र तसेच संत गाडगेबाबा यांचे जीवनावर आधारित पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. या संस्थांनी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता मोहिमा, आरोग्य तपासणी शिबिरे, वाहतूक नियंत्रण आणि निसर्ग संवर्धन यासारखे महत्त्वपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवले.
“या सेवाभावी संस्थांचे योगदान केवळ वारीपुरते मर्यादित न राहता समाजपरिवर्तनाची दिशा देणारे आहे. भविष्यातील वारी आणखी शिस्तबद्ध, स्वच्छ आणि जनसहभागातून संपन्न व्हावी,असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केले.
या संस्थांच्या योगदानामुळे पालखी सोहळा हरीत,पर्यावरणपूरक तसेट सुव्यवस्थित पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
गौरवप्राप्त संस्थांची नावे पुढीलप्रमाणे –
निर्मल वारी आकुर्डी (मिलिंद वाघ), संत निरंकारी क्षेत्र पिंपरी (किशनलाल अडवाणी), डब्ल्यूटीई कंपनी (अशोक कुलकर्णी), संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र (मोहन गायकवाड), श्री. अग्रसेन ट्रस्ट चिंचवडगाव, पिं.चिं. संस्था (पूनम परदेशी), पिंपळवन निसर्ग संवर्धन, नंदनवन कुष्ठपीडित बहुउद्देशीय संस्था (अनिल कांबळे), गुणवंत कामगार कल्याण मंडळ (बाबासाहेब साळुंखे, नंदकुमार धुमाळ), संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन भोसरी (अंगद जाधव) आणि व्हीएसएल फाउंडेशन दिघी (समाधान बोरकर, केशव वाघमारे).