महापालिकेकडून दिव्यांगाना न्यू इअर गिफ्ट; जानेवारीपासून दरमहा निर्वाह भत्ता,

0
236

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पंडित दिनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत दर तीन महिन्यांनी मिळणारा निर्वाह भत्ता नवीन वर्षापासून अर्थात जानेवारीनंतर दरमहा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील संस्था-संघटनांच्या बैठकीत समाजविकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिव्यांगांना जानेवारीपासून दरमहा निर्वाह भत्ता देण्यात येईल असे जाहीर केले.

या योजनेप्रमाणे जूनपर्यंत हे अर्थसाहाय्य दरमहा देण्यात येत होते. मात्र, जुलैपासून अचानक दर तीन महिन्यांनी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यामुळे, अनेक दिव्यांगांचे जनजीवन विस्कळीत झाले. महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पिंपरी महापालिकेच्या आयुक्तांना दिव्यांगांसाठीचे विविध लाभ व सवलती नियमित देण्यासंदर्भात पत्राद्वारे आदेश दिले होते. यामध्ये दिव्यांगांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार नाही. याबाबत खबरदारी घेण्याचे नमूद केले होते. महापालिका आयुक्तांनी दिव्यांगांसाठी कार्यरत संस्था, संघटना पदाधिकारी, विशेष शाळा प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची एकत्र बैठक घेतली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त विठ्ठल जोशी, दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे उपअभियंता बाळासाहेब शेटे, भूमी-जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, अधिष्टाता डॉ. राजेंद्र वाबळे, भांडार अधिकारी मुबारक पानसरे, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अशोक सोळंके, रमेश मुसुडगे तसेच क्षेत्रीय अधिकारी सुचित्रा पानसरे, शीतल वाकडे, उमाकांत गायकवाड, सीताराम भवरे, राजेश आगळे आदी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगांसाठी कार्यरत संस्था, संघटना पदाधिकारी, विशेष शाळा प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीदरम्यान, दिव्यांगांच्या निर्वाह भत्त्यासह महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजनांमध्ये काळानुरूप बदल करणे, दिव्यांगांचा ऑफलाईन घरोघरी सर्वे, दिव्यांगांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, शिक्षणासाठी तसेच, व्यवसायासाठीच्या प्रचलित योजनांमध्ये अटी-शर्ती बदलण्याबाबत तसेच दिव्यांगांच्या रोजगाराला चालना देण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.