महापालिकेकडून तब्बल 26 हजार 760 थकीत मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीसा; 631 कोटी रुपयांचा कर थकीत

0
338

पिंपरी दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने थकीत मालमत्ता धारकांबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 मिळकत धारकांना जप्तीच्या नोटीसा कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी धाडल्या आहेत. तसेच या मालमत्ता धारकांकडे तब्बल 631 कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 79 हजार मालमत्तांची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत सुमारे तीनशे कोटी रूपये कराचा भरणा केला आहे. महापालिकेच्या 17 विभागीय कार्यालयामार्फत कर संकलानांचे कामकाज केले जाते. गतवर्षी कर संकलन विभागाने 625 कोटी कर वसूल केला होता. यंदा मात्र, कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी 1 हजार कोटी रूपयांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने कर संकलन विभाग सातत्याने नव-नवीन योजना राबवत आहेत. शहरातील जास्तीत-जास्त मालमत्ता कर कक्षेत येण्यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने माझी मिळकत माझी आकारणी यो योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर कक्षेत आल्या आहेत. तसेच जनसंवादच्या धर्तीवर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी करसंवादचेही आयोजन करण्यात येत आहे.

कर संकलन विभागाने शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 मालमत्ता धारकांची यादी काढली आहे. त्यानुसार 31 हजार 971 मालमत्ता धारकांना आपली मालमत्ता जप्त का करू नये, अशा नोटीसा धाडल्या आहेत. या सर्व मालमत्ता धारकांकडे शास्तीकर वगळून तब्बल 631 कोटी रूपयांची थकबाकी आहे. या सर्व मालमत्ता धारकांनी लवकरात-लवकर कर भरून, महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे. तसेच त्वरीत कर न भरल्यास मिळकती जप्ती करण्यात येतील, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

चिखलीत सर्वात जास्त थकबाकीदार

कर संकलनासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील 17 ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत. या कार्यालयाअंतर्गत पाच लाखांच्या पुढे थकबाकी असलेल्या 1 हजार 361 व्यावसायिक मिळकती आहेत. या थकबादीरांकडे तब्बल 216 कोटी रूपयांचा कर थकीत आहे. सर्वाधिक थकबाकीदार हे चिखली 209, त्यानंतर वाकड परिसरात 146, भोसरीत 128, दापोडी, फुगेवाडीत 117, आकुर्डी 112, चिंचवड 105, थेरगाव 100 आदी भागातील थकबाकीदार आहेत. तर, मालमत्ता बांधल्यापासून एकदाही कराचा भरणा न केलेल्या मालमत्तांची आकडेवारी समोर आली आहे. 13 ऑगस्ट रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये या 3 हजार 850 मालमत्ता धारकांना कर संकलन विभागाने नोटीसा पाठविल्या आहेत. त्यांच्याकडे 23 कोटी 25 लाखांची थकबाकी आहे.

“कर संकलन विभाग तीन टप्प्यांत थकीत मालमत्ता धारकांवर जप्तीची कारवाई करणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 1 हजार 361 व्यावसायिक मालमत्तांवर, दुसऱ्या टप्प्यात मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 मिळकत धारकांवर तर तिसऱ्या टप्प्यात 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760 धारकांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तसेच करसंकलन विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह आग्रही आहेत. 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न आणि आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या आहेत”, असे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले.