पिंपरी, दि. ९ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय विभाजित प्रारूप मतदार यादीवरील प्राप्त हरकती व सूचनांच्या परीक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. याआधी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची पूर्वनिर्धारित तारीख १० डिसेंबर २०२५ होती.
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केल्यानंतर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी २० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार संबंधित प्रशासकीय प्रक्रिया आणि निवडणूक तयारीची पुढील कार्यवाही नियुक्त कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ, ब, क, ड, इ, ग व ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले स्मारकातील कार्यान्वित कक्षामध्ये नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना निर्धारित मुदतीत सादर केल्या आहेत. प्राप्त अर्जांचे परीक्षण प्रगतीपथावर असून वाढीव मुदतीमुळे प्राप्त प्रकरणांची तपशीलवार पडताळणी करणे आणि प्रभागनिहाय यादीची अचूकता सुनिश्चित करणे अधिक सुलभ होणार आहे.














































