दि . २५ ( पीसीबी ) – शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गातील १३ वर्षीय विद्यार्थिनी आणि तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका संशयीत शिक्षकाला अटक केली. निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ ते १९ जुलै २०२५ या कालावधीत ही घटना घडली.
संतोष हरिभाऊ बेंद्रे (वय ५१, रा. कृष्णानगर, चिखली, पिंपरी-चिंचवड) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. २३ जुलै) रोजी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बेंद्रे हा पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आणि शाळेतील तिच्या इतर मैत्रिणीसोबत अश्लील चाळे केले. तसेच वॉशरुमला डोकावून पाहून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ७४, ७८, ११५(२), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७, ८, ९ (एफ), १२, तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे तपास करीत आहेत.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे निगडी पोलिसांकडून एफआयआर प्राप्त झालेली आहे. त्यानुसार संबंधित शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्याची काय॔वाही सुरु आहे. याबाबत मुख्याध्यापकांकडून अहवाल मागवण्यात येईल. त्यानंतर शिक्षकांवर सेवानिलंबन करण्यात येईल.
-किरण मोरे , सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, महानगरपालिका.