महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षांतून दोनदा आरोग्य तपासणी

0
171

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची वर्षांतून दोनदा मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग अथवा विविध आजार असलेल्या विद्यार्थ्यांच्या आजाराची सर्व माहिती शिक्षण विभाग ठेवणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली.

शहरात महापालिकेच्या 18 माध्यमिक, 110 प्राथमिक 1 संतपीठ अशा 129 शाळा आहेत. या शाळांमध्ये 42 हजार पेक्षा जास्त मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. पालिका शाळेतील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी नुकताच जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. 38 शाळांमध्ये ब्रॅन्डिंग पीसीएमसी स्कूल संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार शाळांमध्ये मुलभूत आणि इतर सुविधांसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व शाळांच्या इमारतींना एकच रंग देण्यात येत आहे.

याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले, महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि मुलांना उच्च दर्जाच्या सुविधा, शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आकांक्षा फाऊंडेशनसह आदींची मदत घेण्यात येत आहे. राष्ट्रीय बाल सुरक्षाकडून वर्षांतून एकदा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. मात्र, आता विद्यार्थ्यांची वर्षांतून दोनदा आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एकदा राष्ट्रीय बाल सुरक्षाकडून आणि दुसऱ्यावेळी पालिकेच्या 8 रूग्णालयात तपासणी करण्याचे नियोजन आहे. तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर तपासण्यासाठी क्‍लॅलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून पाहणी करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर पाहून त्यांना शिक्षण देण्यावर भर आहे.