महापालिका शाळांना मिळतेय पालकांची पसंती!

0
3

प्रवेशसंख्येत होतेय सातत्याने वाढ, नाविन्यपूर्ण उपक्रम, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार शिक्षणामुळे वाढला विश्वास

*पिंपरी, दि .१८ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यू-डायस (UDISE+) च्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे बहुतांश महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना पिंपरी चिंचवडजे महापालिकेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यावरून या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस अधिक सुधारत असल्याचे चित्र आहे. तसेच या शाळांच्या स्वतंत्र मूल्यमापनात शैक्षणिक निकालांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे.

यू-डायसच्या आकडेवारीनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १३४ शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४८ हजार १५३ इतकी असलेली प्रवेशसंख्या वर्ष २०२३-२४ मध्ये ५० हजार ५८१, तर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५० हजार ७४९ वर पोहोचली आहे. तर चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ८ सप्टेंबरपर्यंतच ही संख्या ५४ हजार ४१८ इतकी झाली आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये २४ हजार ७८८ वरून वर्ष २०२३-२४ मध्ये २५ हजार ९०२ आणि शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये २५ हजार ९२२ इतके झाले आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये केवळ प्रवेशसंख्याच वाढत नाही, तर मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये देखील चांगली वाढ दिसून येत आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) च्या मूल्यमापनानुसार प्रारंभीच्या पातळीवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील २८ टक्क्यांवरून वर्ष २०२४-२५ मध्ये १३ टक्क्यांवर आले, तर उच्च पातळीवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ०.५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यामध्ये विशेषतः प्राथमिक वर्गांच्या निकालांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. इयत्ता दुसरीतील प्रारंभी पातळीवरील विद्यार्थी ३० टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत, तर प्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण ० टक्क्यांवरून थेट २५ टक्क्यांवर गेले आहे.

विद्यार्थ्यांना होतो आहे विविध उपक्रमांचा फायदा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा फायदा होत आहे. महापालिकेच्या २११ बालवाड्यांमधील ६ हजारांपेक्षा जास्त मुलांसाठी बालसुलभ वर्गखोल्या आहेत. मूल्यमापनात प्रारंभिक साक्षरता, अंकगणित व इतर कौशल्यांमध्ये २०–२४ टक्के सुधारणा आढळली आहे. याशिवाय ‘स्पंदन’ कार्यक्रम सामाजिक-भावनिक शिक्षण व जीवनकौशल्यांवर भर देत आहे. ‘इंग्रजी अॅज सेकंड लँग्वेज’ (ESL) उपक्रमांतर्गत २७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी इंग्रजी भाषेचा वापर आत्मविश्वासाने करीत आहेत. ‘द आर्ट बॉक्स’ प्रदर्शन व ‘जल्लोष शिक्षणाचा’ यांसारखे सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन विस्तारण्यास मदत करीत आहेत. तर ‘भारत दर्शन’ दौऱ्यांतून गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अनुभव मिळत आहेत. याशिवाय सुरक्षित शिक्षण वातावरणासाठी महापालिकेने एनसीपीसीआर (NCPCR) व एनसीईआरटी (NCERT) मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा सुरक्षा लेखापरीक्षण सुरू केले आहे. पोलीस विभागाच्या ‘पोलीस काका’ व ‘दामिनी स्क्वॉड’ यांच्या सहकार्याने तसेच मुस्कान फाउंडेशन व अर्पण यांच्या माध्यमातून शाळांमध्ये बालसंरक्षण प्रशिक्षण दिले जात आहे. शाळांमध्ये सध्या २३ समुपदेशक कार्यरत असून शाळा व्यवस्थापन समित्या सुरक्षा व बालसंरक्षण उपाययोजनांवर काटेकोरपणे लक्ष देत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशसंख्येत झालेली वाढ ही विशेष उल्लेखनीय आहे. यामधून पालकांचा महापालिका शाळांवरील सुरक्षा व गुणवत्तेवरील विश्वास दिसून येतो. क्युसीआयच्या फ्रेमवर्कमधून महापालिका शाळांमधील शैक्षणिक निकाल सुधारण्याचा उपक्रम यशस्वी ठरत आहे. विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे ही प्रगतीची गती कायम ठेवण्यास महापालिका कटिबद्ध आहे.
*– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

शालेय साहित्याच्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीपासून ते थेट डिजिटल वर्गखोल्यांपर्यंत, वाचनालयांपासून कला शिक्षकांपर्यंत, क्युसीआयच्या मूल्यमापनांपासून प्रत्यक्ष उपक्रमांपर्यंत विविध सुधारणा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये केल्या असून त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. पालकांना देखील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांतील दर्जेदार शैक्षणिक सुविधांची माहिती दिली जात असून त्यामुळे प्रवेशसंख्येत वाढ होत आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ८०४ विद्यार्थांनी प्रवेश घेतला होता. यंदा ही संख्या वाढून ८७४ झाली आहे. त्यात मुलींची संख्या ४०५ वरून ४५८ वर पोहोचली आहे. अधिकाधिक पालक आत्मविश्वासाने आमच्या शाळेची निवड करीत आहेत. पीएम श्री योजनेमुळे आम्हाला खासगी शाळांसारख्या सुविधा मिळाल्या आहेत, ज्यामध्ये रोबोटिक्स व इनोव्हेशन लॅबचाही समावेश आहे. ‘सक्षम’ उपक्रमामुळे आमचे विद्यार्थी अधिक सुसज्ज झाले आहेत.

  • स्नेहल मोरे, मुख्याध्यापिका, पी. एम. श्री पीसीएमसी पब्लिक स्कूल, मेहत्रेवाडी

आमच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या कुटुंबांची संख्या उल्लेखनीयरीत्या वाढत आहे. आमच्या शाळेतील ज्युनिअर केजीच्या ८० जागा लॉटरीद्वारे भरल्या जातात. यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये १०५ मुलांचे आणि ७७ मुलींचे अर्ज आले होते. यंदा अर्जांची ही संख्या जवळपास २० टक्क्यांनी वाढली आहे. फक्त प्रवेशस्तरावरच नव्हे, तर इतर वर्गात पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांची रांग दिसतेय. अनेक पालक त्यांच्या मुलांना खासगी शाळेतून महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. यावरून महापालिका शाळांमधील शिक्षणाची गुणवत्तेवर पालकांचा विश्वास दिसून येतो.

  • परिजात प्रकाश, मुख्याध्यापक, छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी