महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय दरवाढ योग्यच – आयुक्त सिंह

0
233

पिंपरी दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराच्या दरात जास्त वाढ केलेली नाही. महापालिकेची आरोग्य सेवा, रूग्ण सेवा उत्तम दर्जाची आहे. महापालिका रूग्णालयात केलेली दरवाढ ही योग्यच असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. दरम्यान, वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराच्या दरात वाढ केल्यानंतर रुग्णालयातील चलन भरणा 45 लाखांनी वाढला आहे.

महापालिकेचे 8 रुग्णालये आणि 29 दवाखान्यांमधून शहरातील तसेच शहराच्या हद्दीबाहेरील रुग्णांना उपचारार्थ आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या जातात. महापालिका प्रशासकांनी दवाखाने, रुग्णालयातील दरवाढीचा निर्णय घेतला. शासन दरानुसार निर्धारीत केलेले दर महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांकरिता 1 ऑगस्टपासून 2022 लागू केले आहेत. तत्कालीन आयुक्‍त राजेश पाटील यांच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. परंतु, या विरोधाला न जुमानता पाटील यांनी आपला निर्णय कायम ठेवला. नवीन आयुक्‍त सिंह यांनीही दरवाढीचे समर्थनच केले.

आयुक्त सिंह म्हणाले, महापालिकेच्या रूग्णालयातील आरोग्य सेवा अतिशय उत्तम आहे. त्या तुलनेत रूग्णालयातील दर अतिशय कमी होते. त्यामुळे पालिकेच्या रूग्णालयात राज्य सरकारच्या दराप्रमाणे दरवाढ केली असून ही दरवाढ जास्त नाही. तसेच वायसीएममध्ये औषधांची कमतरता असेल तर याचाही आढावा घेतला जाईल.