पिंपरी , दि,४ (पीसीबी) – – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्यानंतर यापदासाठी महापालिकेत पात्र अधिकारीच नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे मुख्य अग्निशामक अधिकारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या पदावर आता शासनाचा अधिकारी येणार आहे.
मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे हे नियत वयोमानानुसार 31 ऑक्टोबर 2022 रोजी पालिका सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर तत्काळ दुस-या अधिका-याकडे हे पद देणे अपेक्षित होते. परंतु, अग्निशामक विभागाकडे या पदासाठी एकही पात्र अधिकारी नसल्याचे समोर आले. मुख्य अग्निशामक अधिकारी या पदावर उप अग्निशामक अधिकाऱ्याला बढती मिळू शकते. मात्र, महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडे गेल्या कित्येक वर्षांपासून उप अग्निशामक अधिकारी हे पद देखील रिक्त आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 27 लाखांवर पोहोचली आहे. वाढत्या शहराबरोबर विविध भागात आगीच्या, आपत्तीच्या घटनाही वेळोवेळी घडत असतात. विविध इमारतींचे बांधकाम, रूग्णालयांसाठी अग्निशामक विभागाचा ना-हरकत (एनओसी) दाखला देणे अत्यंत महत्वाचा असतो. हा दाखला मुख्य अग्निशामक अधिकारीच त्यांच्या स्वाक्षरीने देतात. परंतु, अधिकारीच नसल्याने हे काम खोळंबले आहे.
मुख्य अग्निशामक अधिकारी गावडे हे सेवानिवृत्त होणार असून त्यांच्या जागी पात्र व्यक्ती नाही, याची प्रशासनाला पूर्व कल्पना होती. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने अद्याप कोणतीही तजवीज केली नाही. मुख्य अग्निशामक अधिकारी या पदासाठी विभागीय अग्निशामक अधिकारी हा कोर्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. पदवीधर आणि उप अग्निशामक अधिकारी पदावर काम केल्याचा अनुभव असणे बंधनकारक आहे. मात्र, या पदासाठी अग्निशामक विभागाकडे सध्या तरी एकही अधिकारी नाही. त्यामुळे हे पद रिक्त ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.
मुख्य अग्निशामक अधिकारी व उप अग्निशामक अधिकारी ही दोन्ही पदे भरण्यासाठी महापालिकेने दोन महिन्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द केली होती. यासाठी अर्जही आले आहेत. या पदासाठी लवकरच परिक्षा घेण्यात येणार आहे. मुख्य अग्निशामक अधिकारी देण्यासाठी शासनाकडे मागणी केली जाणार आहे. आकृतीबंधात हे पद शासनाकडील अधिका-यासाठीच आहे, असे प्रशासनाने सांगितले.