महापालिका प्रारुप मतदार यादीवर 5 हजार हरकती

0
276

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी महापालिका निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवर 5 हजार हरकती नोंदविल्या आहेत. या हरकती निकाली काढत अंतिम याद्या 9 जुलै रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत.

महापालिका प्रशासनाने  23 जून रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. 31 मे 2022 अखेरपर्यंत विधानसभा मतदारयादीमध्ये नोंदी झालेल्या मतदारांची नावे घेतली आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 5 लाख 86 हजार 849 मतदार आहेत. तर, भोसरी विधानसभा मतदारसंघात 5 लाख 27 हजार 799, पिंपरी विधानसभेत 3 लाख 76 हजार 470 आणि भोर विधानसभा मतदारसंघातील ताथवडेगावात 9 हजार 575 मतदार आहेत. एकूण 15 लाख 693 मतदार आहेत. त्यापैकी 12 हजार 564 वगळलेले म्हणजे स्थालांतरित किंवा मयत झालेले मतदार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीला 14 लाख 88 हजार 129 मतदारांना हक्क बजाविता येणार आहे. त्यात पुरुष 8 लाख 394, महिला 6 लाख 87 हजार 647 आणि इतर 88 मतदार आहेत. दरम्यान, 2017 च्या निवडणुकीपेक्षा 3 लाख मतदार वाढले आहेत.

मतदार याद्यावर सुरुवातील 30 जूनपर्यंत हरकती घेण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र, हरकती घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली होती. त्यानुसार 3 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली होती. रविवारअखेर 5 हजार हरकती दाखल झाल्या आहेत.
हरकतींवर निवडणूक विभागाचे कर्मचारी समक्ष जावून हरकतीमध्ये तथ्य आहे का? याची पाहणी करणार आहेत. यासाठी 235 प्रगणक, 48 सुपरवायझर, 8 क्षेत्रीय अधिकारी आणि महापलिका मुख्यालयात 16 असे एकूण 307 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 9 जुलै रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले. दरम्यान, 275 प्रभाग याद्या विकल्या असून यामधून 6 लाख 33 हजार 320 रूपयांचे उत्पन्न निवडणूक विभागाला मिळाले आहे.