महापालिका प्रशासनाच्या खाबुगिरीचे ‘इमले’

0
161

बोगस परवानग्यांमुळे शहरात धोकादायक बांधकामे अमोल थोरात यांचा गंभीर आरोप

पिंपरी, दि. १४ (पीसीबी): वाकड येथे तीन मजली इमारत कलल्यामुळे धोकादायक झाली होती. त्यामुळे हे बांधकाम जमीनदोस्त करावे लागले. शहरातील बांधकाम प्रकल्पांना नियमानुसार परवानगी देणे आवश्यक आहे. तांत्रिक बाबी व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बांधकाम अभियांत्रिकीचे निकष पायदळी तुडवत परवानगी दिल्यानेच अशी धोकादायक बांधकामे शहरात होत आहेत. महापालिका प्रशासनाकडून खाबुगिरीचे ‘इमले’ उभारल्यानेच हे प्रकार घडत आहेत, असा आरोप भाजपाचे अमोल थोरात यांनी केला आहे.

वाकड येथे तीन मजली इमारत धोकादायकपद्धतीने उभारण्यात आली. महापालिकेला ही इमारत पाडावी लागली. ही मोठी नामुष्की असून, बांधकाम अभियांत्रिकी क्षेत्रासाठी लाजीरवाणी बाब आहे. याला पूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप अमोल थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. शहरातील बांधकामांना परवानगी देण्यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र बांधकाम परवाना विभाग आहे. महापालिका हद्दीतील प्रत्येक बांधकाम प्रकल्पाला परवाना विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. वाकड येथील ‘त्या’ बांधकामाला देखील परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अशी परवानगी देताना महापालिका परवानगी विभागातील संबंधित अधिकारी, वास्तू विशारद, आरेखक, बांधकाम अभियांत्रिकीशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रकल्पाबाबत परवानगी देताना नियमांकडे दुर्लक्ष केले. तसेच बांधकामांसाठी आवश्यक निकषांना बाजूला सारत परवानगी दिली. परिणामी बांधकाम धोकादाय होऊन इमारत पाडावी लागली.

महापालिका आयुक्त म्हणून शेखर सिंह यांचा संबंधित विभागावर वचक नसल्याचे दिसून येते. तसेच महापालिका प्रशासनाकडून खाबुगिरीचे हे ‘इमले’ त्यांच्याच संमतीने उभारण्यात येत असल्याचे दिसून येते. यापूर्वीही महापालिकेच्या विविध विभागांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आले. मात्र, तरीही महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घातले. तसेच स्वत: देखील काही चुकीचे निर्णय घेऊन शहरवासीयांच्या पैशांची उधळपट्टी केली. प्रयोग म्हणून काही प्रकल्पांसाठी मोठा खर्च केला. मात्र, प्रत्यक्षात हे प्रकल्प पूर्णपणे फसले.

महापालिका प्रशासनातील खाबुगिरी वाकड येथील पाडण्यात आलेल्या इमारतीच्या प्रकरणावरून समोर आली आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच इतर विभागांतील खाबुगिरी मोडीत काढावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.