पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे महापालिका, पोलीस यंत्रणा यांसह सर्व संलग्न आस्थापनांनी समन्वय ठेवून एकत्रितपणे नियोजन करावे.पालखी मार्गावर फिरती शौचालये तसेच महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग व बर्निंग मशीन ठेवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, देहू कॅन्टॉन्मेंट बोर्ड, आळंदी नगर परिषद आणि देहू नगरपंचायतीचे अधिकारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व आस्थापनांच्या समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच पालखी नियोजनासंबंधी पूरक मागण्यांबद्दल उहापोह करण्यात आला. या बैठकीस मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे बोलत होते.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, सतीश इंगळे, उपआयुक्त संदीप खोत, विठ्ठल जोशी, सचिन ढोले, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, थॉमस नरोन्हा, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, देहू कॅन्टॉमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, आरोग्य निरीक्षक किरण गोंटे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल दबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश यादवाडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत पोलीस विभाग तसेच देहू कॅन्टॉन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी पालखी नियोजनासंबंधी पिंपरी चिंचवड महापालिकेने सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मुक्कामाच्या ठिकाणी व शहरात पालखीमार्गावर ठिकठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने मनुष्यबळासह यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक संख्येनुसार टँकर उपलब्ध करून द्यावे, पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती महापालिकेच्या वतीने केली जावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्त ढाकणे म्हणाले, यंदाची आषाढीवारी बॅनरमुक्त, प्लास्टिकमुक्त वारी व्हावी यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. महापालिकेच्या वतीने वारक-यांच्या सेवेसाठी आणि आपत्कालीन परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मुख्य कंट्रोल रूमची उभारण्यात येणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी फिरत्या कंट्रोल रूमची व्यवस्था करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार ड्रोन कॅमेराची व्यवस्थाही करण्याचे नियोजन आहे. सर्व आस्थापनांना अंतर्गत जलद संपर्क साधता यावा याकरिता वॉकीटॉकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने अग्निशमन सेवा, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार असून पालखी मार्गावर प्रत्येक 200 मीटर अंतरावर अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर फिरती शौचालये तसेच महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग व बर्निंग मशीन ठेवण्यात येणार आहेत.