महापालिका पदभरती! 128 जागांसाठी तब्बल 19 हजार अर्ज, शनिवारी परीक्षा

0
402

पिंपरी दि. २२ (पीसीबी)
– पिंपरी-चिंचवड महापालिकेची रूग्णालये आणि दवाखान्यांसाठी ‘अ’ ते ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरती करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 128 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी तब्बल 19 हजार 56 जणांनी अर्ज केले आहेत.  त्यासाठीची परिक्षा येत्या शनिवारी (दि. 25) होणार आहे. राज्यातील 13 शहरात 47 केंद्रावर दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे.

 महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला. त्यामुळे अनेक नवीन पदे निर्माण झाली आहेत. तसेच, दर महिन्यास किमान 50 ते 100 अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर तसेच, स्वेच्छा निवृत्ती घेऊन निवृत्त होत आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी आहे. तर, दुसरीकडे दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिकेवर ताण येत आहे. तसेच महापालिकेची भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. एप्रिल महिन्यामध्ये राज्य शासनाने सर्व महापालिकांना नोकर भरती करण्यात परवानगी दिली आहे.

त्यानुसार महापालिकेमध्ये पहिल्या टप्यामध्ये वैद्यकीय विभागांच्या पदांची भरती करण्यात येणार आहे. 128 जागांसाठी 19 हजार 56 जणांनी अर्ज केले आहेत. शनिवारी राज्यातील 13 शहरांमध्ये 47 केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी टीसीएस या खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहाय्यक, लॅब टेक्‍निशियन, एक्‍स रे टेक्‍निशयन, फार्मासिस्ट, एएनएम या सात पदांची भरती करण्यात येणार आहे. दरम्यान, स्टाफ नर्स या पदासाठी सर्वाधित अर्ज आले आहेत. या पदाच्या 70 जागा असून त्यासाठी तब्बल 10 हजार 15 अर्ज आले आहेत. तर त्याखालोखाल एएनएम या पदासाठी 4 हजार 26 अर्ज आले असून त्याच्या 31 जागा आहेत.

पदनाम-पदसंख्या-एकूण अर्ज-
वैद्यकीय अधिकारी-13-200-

स्टाफ नर्स- 70-10,015-
सांख्यिकी सहाय्यक-03-439-
लॅब टेक्‍निशियन-01-191-
एक्‍स रे टेक्‍निशयन-03-270-
फार्मासिस्ट-07-3915-
एएनएम-31-4026-
एकूण-128-19056-