386 पदांसाठी 1 लाख अर्ज
पिंपरी दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील ब आणि क गटातील 386 पदांसाठीच्या सरळ सेवा भरतीसाठी तब्बल 1 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. महापालिकेने इच्छूकांना अर्ज करण्यास 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर भरतीवरील निर्बंध उठविले आहेत. त्यानंतर प्रशासनाने विविध पदांसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेची वैद्यकीय विभागातील भरती प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे. महापालिका सेवेतून दरमहा नियत वयोमानानुसार 20 ते 25 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. काही कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. त्यामुळे महापालिकेत सुमारे पाच हजार पेक्षा पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने सरळ सेवेने भरती प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे.
विविध विभागातील ब आणि क गटातील 386 रिक्त पदांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये लिपिक-213, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 75, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-41, कनिष्ठ अभियंता (विद्युत)-18, आरोग्य निरीक्षक-13, अतिरिक्त कायदा सल्लागार-1, विधी अधिकारी-1, उपमुख्य अग्शिमन अधिकारी-1, उद्यान निरीक्षक-4, हॉट्रीकल्चर सुपरवायझर-8 अशी विविध पदांसाठी महापालिकेने ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.