महापालिका निवडणूक २२ जानेवारीलाआयोगाच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब

0
25

मुंबई, दि. ४ – आरक्षण मर्यादा ५० टक्केपेक्षा अधिक असणाऱ्या २० जिल्हा परिषदा आणि १५६ पंचायत समित्या असल्याने तिथे पुन्हा सोडत काढावी लागणार आहे. सर्व प्रक्रिया वेळखाऊ असल्याने महापालिका एन निवडणूक २२ जानेवारीला घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांनी त्याची कल्पना दिली असून तयारीला लागा असा संदेश दिला आहे.
नगरपालिका-नगर पंचातींच्या निवडणुकीचा टप्पा मार्गी लावल्यांतर राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व महापालिका आयुक्तांची बैठक बोलाविली आहे. यात प्रामुख्याने मतदार याद्यांबाबत आढावा घेतला जाणार असून, ८ ते १५ डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत कोंडी निर्माण झाली आहे. न्यायालयाने ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्याच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश आयोगास दिले आहेत. त्यानुसार निवडणुका झाल्या तर विदर्भ आणि मराठवाड्यातील बहतांश जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार नाहीत. अशा परिस्थितीत ओबीसी समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागेल याची भाजपला धास्ती लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाजूला ठेवून आधी महापालिकांच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईसह अनेक महापालिकांच्या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळल्याने त्यावर हरकती घेण्यासाठी आयोगाने राजकीय पक्षांना दिलेली मुदत बुधवारी (दि. ३) संपली. पालिकांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले असणे, १ जुलै, २०२५ च्या विधानसभा मतदार यादीत नावे असूनही पालिकेच्या यादीत संबंधित प्रभागात नावे समाविष्ट झाली नाहीत, अशा अनेक तक्रारी पालिका आय़ुक्तांकडे दाखल झाल्या आहेत. त्याबाबत त्वरित मतदार याद्या दुरुस्त करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. आयोगाच्या आदेशानुसार पालिकांनी किती प्रमाणात मतदार याद्या दुरुस्त केल्या आहेत. तसेच पालिका निवडणुकांची तयारी कुठवर आली आहे याचा आढावा घेण्यासाठी निवडूक आयोगाने सर्व पालिका आय़ुक्तांची बैठक आहे.