महापालिका निवडणूक वेळेतच होणार

0
28
  • मतदार यादी सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र नाही.
  • केंद्र निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट

  • नवी दिल्ली, दि. २७ –
    मतदार यादी सुधारणेचा दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम देशातील १२ राज्यात होणार असून त्यात महाराष्ट्राचा समावेश नसल्याने राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचाय समितीच्या म्हणजेच स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका वेळेतच होणार हे स्पष्ट झाले.
    केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कोण कोणत्या राज्यांतून मतदार यादी सुधारणा कार्यक्रम होणार याची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात बिहार राज्यात हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. आता अंदामान निकोबार, छत्तीसगड, केरळ, लक्षद्विप, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजऱात, गोवा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांतून त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी मोठी यंत्रणा सज्ज आहे. आज मध्य़ रात्री पासून त्या त्या राज्यांची मतदारयादी सील कऱण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    मतदार यादीत खूप मोठा घोळ असल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आमदारांसह ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही पुराव्यांसह केला होता. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यात समहती दर्शविली होती. परिणामी मतदार यादी सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्राचा नंबर लागला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जातील अशी अटकळ होती. प्रत्यक्षात महाराष्ट्र त्या कार्यक्रमात नसल्याने आता डिसेंबर, जानेवारी दरम्यान होणाऱ्या निवडणुका वेळेतच होतील, हे स्पष्ट झाले.
    महाराष्ट्रात महापालिका २९, जिल्हा परिषद ३६, नगरपालिका २५७, पंचायत समिती २८८ अशा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत , मतदार यादी आदी कार्यवाही सुरू आहे. तीन टप्प्यांत या निवडणुका होणार आहेत. प्रथम जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती, दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपरिषदा आणि शेवटच्या टप्प्यात महापालिका असा या मिनी विधानसभांचा कार्यक्रम नियोजित आहे.