महापालिका निवडणूक, मनसेकडून 1 हजार मतांच्या मागे 1 ‘राजदूत’

0
223

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 1 हजार मतांच्या मागे 1 राजदूत तर 50 ते 100 मतांच्या मागे 1 महाराष्ट्र सैनिकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघानुसार पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची यादी उपशहराध्यक्ष व विभाग अध्यक्ष यांच्याकडून घेण्यात आली.

महापालिका निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांची रविवारी महत्वाची बैठक पार पडली. मनसेचे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागस्कर, राज्य सरचिटणीस किशोर शिंदे, गजानण राणे, उपाध्यक्ष गणेश सातपुते, शहराध्यक्ष सचिन आदी उपस्थित होते. विभागप्रमुखांनी प्रामुख्याने प्रचाराचे नियोजन करणे, निवडणूक रणनीती आखणे, मेळावे व सभेचे नियोजन करणे, शहराचे प्रश्न, निवडणुकीचे मुद्दे, पक्षाची भूमिका, मीडियाशी संपर्क करणारी यंत्रना, You Tube, Social Media सांभाळणाऱ्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन देणारी व्यक्ती नेमणे, शहराच्या मुद्यांवर बोलण्यासाठी योग्य प्रवक्ता नेमून त्याला मार्गदर्शन करणे, निवडणुकीला सामोरे जाताना शहराचा वचननामा (जाहीरनामा) योग्य पद्धतीने तयार करणे,निवडणूक प्रतिनिधींना लागणाऱ्या सर्व कायदेशीर परवानग्या मिळवून देण्यास योग्य टीम तयार करणे, पक्ष नेतृत्वाला पक्षाचा व उमेदवाराचा अचूक व कठोर अहवाल सांगणे.

उमेदवारासाठी घरोघरी पोहचण्यासाठी कार्यक्रम आखून देणे, ज्या प्रभागात इतर जिल्ह्यातील जास्त लोक राहत असतील, अश्या ठिकाणी प्रचारासाठी त्या जिल्ह्यातील वक्त्याला प्रचारासाठी आणणे, 1000 मतांच्या मागे 1 राजदूत व 50 ते 100 मतांच्या मागे 1 महाराष्ट्र सैनिकांची नेमणूक करणे, शहरातील पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाची जबाबदारी घेणे. निवडणुकीत जास्तीतजास्त यश मिळवण्यासाठी लागणारी सर्व शक्ती, साधणे यांची पूर्तता करणे, निवडून येणाऱ्या फिक्स प्रभागांवर लक्ष केंद्रीत करणे, पूर्ण शहरातील मुख्य पदाधिकाऱ्यांमधील संवाद टिकवणे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या मुद्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश नेते अनिल शिदोरे यांनी दिले आहेत.