पिंपरी , दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी महापालिकेला आणखी पाच दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. आता 21 जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करून प्रसिद्ध करावी लागणार आहे.
प्रारूप मतदार यादी तयार करताना मोठ्याप्रमाणात घोळ झाला आहे. प्रभागातील हजारो मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. त्यामुळे हक्काचे मतदार दुसरीकडे गेल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल 8 हजार 700 नागरिकांच्या हरकती आलेल्या आहेत. हरकतीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी लागत आहे. हरकतीचा निपटारा करणे निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. अतिवृष्टी आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करणे जिकरीचे असल्याने आयोगाने यापूर्वी 9 जुलै ऐवजी अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यासाठी 16 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली होती.
नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींचा निपटारा स्थळपाहणी करून योग्य रितीने करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने आणखी मुदतवाढ दिली आहे. आता 21 जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करून प्रसिद्ध करावी लागणार आहे. याबाबतचा आदेश आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आज (गुरूवारी) महापालिकेला दिला आहे.