महापालिका निवडणूक! अंतिम मतदार याद्या मुदतीत प्रसिद्ध झाल्याच नाहीत

0
216

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी आज (गुरुवारी) प्रसिद्ध करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन निवडणूक विभागाकडून झाले नाही. कामकाजाची वेळ संपली तरी निवडणूक शाखेकडून मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना याद्या न पाहता महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालयातून जावे लागले. त्यांचा हेलपाटा झाला.

महापालिका निवडणुकीला 14 लाख 88 हजार 129 मतदारांना हक्क बजाविता येणार आहे. त्यात पुरुष 8 लाख 394, महिला 6 लाख 87 हजार 647 आणि इतर 88 मतदार आहेत. प्रारुप मतदार यादीवर तब्बल 8 हजार 700 हरकती आल्या होत्या. हरकतींचा निपटारा करण्यासाठी आयोगाने दोनवेळा मुदताढ दिली. निवडणूक आयोगाने 21 जुलै रोजी म्हणजे आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा आदेश दिला होता. परंतु, आजचा दिवस संपत आला. परंतु, अद्याप यादी प्रसिद्ध झाली नाही.

प्रारुप मतदार यादी राष्ट्रवादीला अनुकूल, क्षेत्रीय कार्यालयावर संगनमत करून नावे यादीत टाकणे, त्यात अनेक बोगस मतदार टाकणे, बहुतांश सर्व प्रभागातील हजारो मतदार दुसऱ्या प्रभागात गेल्याचा सुरुवातीला आरोप झाला. दरम्यान, राज्यात सत्ता बदल झाला. त्यानंतर भाजपच्या माजी नगरसेवकांचा निवडणूक विभागात राबता वाढला.

आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची आज अंतिम मुदत दिली. त्यानुसार महापालिका मुख्यालय आणि आठ क्षेत्रीय कार्यालयात यादी प्रसिद्ध करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार नागरिक, कार्यकर्ते, इच्छुक, माजी नगरसेवक याद्या पाहण्यासाठी महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालयात गेले. परंतु, सायंकाळचे सहा वाजून गेले तरी मतदार यादी प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे नागरिकांचा हेलपाटा झाला. दरम्यान, शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत घोळ सुरु होता. विशेषता भोसरी मतदारसंघातील याद्यांमध्ये मोठा घोळ केल्याचे आरोप होत आहेत. आजच्या दिवस संपला तरी निवडणूक विभाग याद्या प्रसिद्ध करु शकला नाही.