महापालिका निवडणुकीसाठी उद्या चिंचवडमध्ये आरक्षण सोडत; ‘अशी’ काढणार सोडत

0
331

ओबीसींसाठी 37 जागा राखीव

पिंपरी दि. २८ (पीसीबी) – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतर सर्वाचे लक्ष लागलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत उद्या (शुक्रवारी) होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 37 आणि सर्वसाधारण महिलांसाठीच्या 38 जागांसाठी सोडत काढली जाणार आहे. इच्छुकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले असून सोडतीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सोडतीची रंगीत तालीम आज (गुरुवारी) घेतली. दरम्यान, 25 प्रभागात दोन उमेदवार राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात होईल. ए-फोर साईजच्या को-या कागदावरुन आरक्षणाच्या चिठ्ठया तयार केल्या जातील. एका रंगाच्या रबरने त्या गुंडाळल्या जातील. गोल डब्यामध्ये टाकून फिरविल्यानंतर शाळेतील मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढल्या जातील. एससी, एसटीच्या 25 जागांचे पूर्वी काढलेले आरक्षण कायम राहणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे 114 जागांमधून ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठीच्या जागांचे आरक्षण काढले जाईल.

सुरुवातीला ओबीसींच्या 37 राखीव जागांसाठी सोडत काढली जाईल. त्यानंतर या 37 जागांमधून महिलांसाठीच्या राखीव 19 जागांसाठी सोडत काढण्यात येईल. शेवटी सर्वसाधारण महिलांसाठीच्या 38 जागांची सोडत काढली जाईल. सर्वसाधारण पुरुषांसाठी 39 जागा असणार आहेत. सोडतीनंतर निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. प्रत्येक प्रभागात पुरुष उमेदवारासाठी एक जागा असेल. तर, सुमारे 25 प्रभागात दोन महिला उमेदवार राहतील.

खुल्या प्रवर्गासाठी 77, ओबीसींसाठी 37 जागा

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 46 प्रभाग आहेत. तर, नगरसेवकसंख्या 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती (एससी) 11 पुरुष 11 महिला अशा 22, अनुसूचित जमाती (एसटी) 2 महिला 1 पुरुष अशा 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसाठी) 19 महिला 18 पुरुष अशा 37 आणि खुल्या गटासाठी 38 महिला 39 पुरुष अशा 77 जागा अशी वर्गवारी आहे.

एससी, एसटीचे आरक्षण कायम!

एसीसी, एसटीचे आरक्षण कायम राहणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात 19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14 या प्रभागात महिलांसाठी 11 जागा राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुषासांठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी 44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 एसटी समाजातील पुरुषासाठी राखीव झालेला आहे.

इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष
इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष लागले आहे. आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर कोण सुपात आणि कोण जात्यात, हे स्पष्ट होणार आहे. अनेक माजी नगरसेवकांना याबाबतची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर काही नगरसेवकांना अन्य प्रभागांत संधी शोधावी लागेल अथवा कुटुंबातील महिलेला संधी द्यावी लागू शकते.