महापालिका निवडणुकीच्या व्हिडीओ शुटींगकरिता 46 लाखांचा खर्च..

0
205

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या कामकाजासाठी व्हिडीओ शुटींगकरिता कॅमे-यासह 75 कॅमेरामन पुरविण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. 45 दिवसांसाठी प्रतिदिन 1 हजार 370 रूपये याप्रमाणे 46 लाख रूपये खर्च होणार आहे.  

पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणूक आगामी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभुमीवर महापालिका प्रशासनाने निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना, मतदार यादी तयार करणे आदी प्रक्रीया पार पडल्या आहेत. निवडणूक आयोगामार्फत केव्हाही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रीयेमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचार रॅलीपर्यंत अनेक गोष्टींसाठी व्हिडीओ शुटींग करावी लागते. त्या अनुषंगाने महापालिकेच्यावतीने 45 दिवसांसाठी कॅमे-यासह 75 कॅमेरामन पुरविण्यासाठी  इच्छूक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या.

निविदा दर 55 लाख 18 हजार रूपये अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये चिंचवड येथील दर्शन डिजीटल व्हिडीओग्राफी यांनी प्रती दिन 1 हजार 370 रूपये म्हणजेच 45 दिवसांसाठी 46 लाख 23 हजार रूपये दर सादर केला. हा दर निविदा दरापेक्षा 16.20 टक्के लघुत्तम असल्याने निविदा स्विकृत करण्याचे आदेश देण्यात आले. दर करारानुसार एक वर्षे कालावधीसाठी त्यांची एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.