पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने काढलेले अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरितेचे अंतिम आरक्षण आज (सोमवारी) राजपत्रात प्रसिद्ध केले. आरक्षण सोडतीवर आलेल्या 273 हरकती निवडणूक शाखेने निकाली काढल्या आहेत.
महापालिका प्रशासनाने 31 मे रोजी ओबीसी आरक्षणाविना महिलांसाठीची आरक्षण सोडत काढली. पिंपरी महापालिकेत 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात महिलांसाठी 19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14 अशा 11 महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुष, महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) महिलासाठी 44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग 6 मधून एसटी समाजातील पुरुष, महिलेला लढता येईल.
तर, सर्वसाधारण महिलांसाठी 57 जागा आहेत. त्यातील 45 जागा थेट पद्धतीने राखीव झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 46 मध्ये थेटपद्धतीने एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव केली. त्यामुळे 12 प्रभागासाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी 40, 12, 36, 7, 21, 13, 1, 42, 8, 31, 27, 30 हे प्रभाग राखीव झाले. तर उर्वरित प्रभाग हे पुरूषांसाठी राखीव झाले आहेत. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत 1 ते 6 जून 2022 दरम्यान नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या.
या मुदतीत आरक्षण सोडतीवर 273 हरकती आल्या होत्या. त्यात प्रभाग क्रमांक 2 चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडीतील एससीच्या आरक्षणावर आणि प्रभाग क्रमांक 5 चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडीतील एसटी आरक्षणा बदलावर सर्वाधिक हरकती आहेत. या दोन प्रभागाबाबत 269 हरकती एकाच व्यक्तीने दिल्या होत्या. हरकती एकसारख्याच आहेत. या दोनही प्रभागातील आरक्षण राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या पातळीवर बदलले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक 34, 35, 43, 11 याबाबत देखील हरकती आल्या होत्या. या हरकती निकाली काढण्यात आली. आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण आज 13 जून रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केले आहे.