महापालिका निवडणुकित भाजप स्वतंत्रपणे लढणार ?

0
77

– पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या कार्यक्रमात सुतोवाच

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – आगामी महापालिका निवडणुकित शहर भाजप स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे सुतोवाच आज जेष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आयोजित आमदारांच्या सत्कार सोहळ्यात कऱण्यात आले. भोसरीतून सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल महेश लांडगे आणि चिंचवड मधून लाखाच्या फरकाने जिंकल्याबद्दल शंकरशठ जगताप यांचा संत तुकाराम महाराज शैलीतील पगडी देऊन दानवे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत महापालिका स्वतंत्र लढण्याची मागणी पुढे आली आणि त्यावर बोलताना श्री दानवे यांनीही, आता महापालिकेत सत्ता आणायला दुसऱ्या कोणाची गरज नाही, लांडगे-जगताप पुरेसे आहेत, असे म्हटले. भाजप कार्यकर्त्यांनी त्यावेळी जल्लोष केला.

यावेळी आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे आदीसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना दानवे म्हणाले, गेल्यावेळी महापालिकेत सत्ता आणायसाठी मोठी कसरत करायला लागली. जगताप यांना आग्रह केला म्हणून ते आले पण लांडगे आल्याशिवाय सत्ता येणार नाही म्हणून त्यांनाही आणले. आझमभाई पानसरेसुध्दा आल्याने ते शक्य झाले. मात्र, यावेळी दुसऱ्या कोणाची गरज लागणार नाही. लांडगे- जगताप ताकदिने उभे राहिल्याने आपली सत्ता शंभर टक्के येणार अशी ग्वाहीच श्री दानवे यांनी दिली.
महाविकास आघाडीने विजयाची स्वप्ने पाहिली. कुठल्या नेत्याला कुठलं खातं द्यायचं. कोणाला मंत्री पद द्यायचं. कोणाला जेलमध्ये टाकायचं हे सर्व ठरवलं होतं. पण, जनता सुज्ञ असल्याने मतदारांनी आम्हाला कौल दिला. असा दावा माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये व्यक्त केला.
आमदार महेश लांडगे यांनी सत्तांतराची गोष्ट सांगितली. कॅमेरा बंद करायला लावून अनेक गोष्टींचा लांडगे यांनी उलगडा केला आणि चौफेर फटकेबाजी केली.
दानवे म्हणाले, विरोधक अद्याप ही हार मानायला तयार नाहीत. ते आता ईव्हीएमला दोष देत आहेत. ते नागरिकांना काही बोलू शकत नाहीत. गेल्या ४५ वर्षात आम्ही अनेक निवडणूका पाहिल्या, लढलो. हार पत्करली. पण, आम्ही कधी संशय घेतला नाही. आता विजयी झालो तर विरोधक ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आहेत. लोकसभेत आम्हाला अपयश आलं. हरियाणा, कर्नाटकमध्ये हरलो. तेव्हा आम्ही संशय व्यक्त केला नाही. विरोधकांना पराभवाचे कारण शोधता येत नसल्याने ते ईव्हीएमला दोष देत आहेत, असं मत दानवे यांनी व्यक्त केलं आहे.
अमित गोरखे म्हणाले, पिंपरी- चिंचवडमध्ये महायुतीच्या आमदारांची मोठी ताकद आहे. शहराला नक्कीच मंत्रिपद मिळेल अशी आशा व्यक्त केली.