महापालिका दवाखाना महागला

0
197

पिंपरी,दि. ११ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराकरीता शासन दराप्रमाणे आकारणी करण्याबाबतचे धोरण महापालिकेने तयार केले आहे. यासाठी २०१० साली लागू करण्यात आलेल्या दरपत्रकानुसार सध्या आकारणी करण्यात येत असून अद्यापपर्यंत सुधारीत दर निश्चित केलेले नाहीत.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्र वैशिवि-२०१७/प्रक्र।१९१/प्रशा-२ दि २० नोव्हेंबर २०१७ नुसार राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालये आणि दवाखान्यातील औषधोपचार तसेच निरनिराळ्या वैद्यकीय सुविधांसाठी निर्धारीत केलेले सुधारीत दर हे महापालिका रुग्णालये आणि दवाखान्यांकरीता लागू करण्यासाठी महापालिकेने धोरण तयार केले असुन या धोरणास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.

याबाबत सविस्तर आदेश निर्गमित करण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि इतर शासकीय रुग्णालयांमध्ये शासन दर आकारणी लागू आहे. त्या दरांप्रमाणे महापालिकेच्या वतीने दर आकारणी केली जाणार आहे. महानगरपालिकेच्या व शासनाच्या दरामधील तफावत उदाहरणादाखल खालील प्रमाणे आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे एकुण ८ रुग्णालये आणि २९ दवाखान्यांमधून शहरातील तसेच शहराच्या हद्दीबाहेरील रुग्णांना उपचारार्थ आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या जातात. पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्य असल्याचा पुरावा सादर न करणा-या रुग्णांकडून प्रत्येक वैद्यकीय शिर्षातील आंतररुग्ण बिलामध्ये महापालिकेमार्फ़त सध्याच्या दरानुसार २० टक्के जादा फ़ी आकारली जाते. तसेच ओपीडी रुग्णांच्या बाबतीत वास्तव्याचा पुरावा आवश्यक नसतो, असे महापालिकेचे सध्याचे धोरण आहे. नव्या धोरणात त्याप्रमाणेच कार्यवाही करण्याचे निश्चित केले आहे. शासन दरानुसार निर्धारीत केलेले दर महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांकरिता लागू करणे तसेच यापुढे वेळोवेळी शासनाकडून प्राप्त होणा-या सुधारीत दरानुसार आयुक्तांच्या मान्यतेने नवीन दर लागू होतील.

शासनाकडील नियमानुसार सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ( उदा. गरोदर माता तपासणी, प्रसुती सेवा व प्रसुती नंतर मातेस, बालकास ३० दिवस सेवा, सिजरीयन सेवा, लहान मुलांचे लसीकरण, संदर्भ सेवा, गरोदर माता सोनोग्राफी व रक्त तपासणी, कोविड व इतर) आणि राज्य शासनाच्या योजनेप्रमाणे तसेच दारिद्रयरेषेखालील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना मोफत वैद्यकीय उपचार सुविधा पुर्वीप्रमाणेच असतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व पिवळ्या व केशरी शिधापत्रिका कार्डधारक रुग्णास मोफत सुविधा दिली जाईल. परंतु जे रुग्ण केशरी शिधापत्रिकाधारक आहेत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बसत नाहीत फक्त अशाच रुग्णांना शासनाकडील दरांनुसार दर आकारणी केली जाणार आहे. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सध्या सुरु असुन इतर रुग्णालयांमध्येही तशी सुविधा सुरु करण्याच्या दृष्टीने कामकाज सुरु आहे.

महापालिकेच्या वतीने थेरगाव रुग्णालय-२०० बेड्स, जिजामाता रुग्णालय-१३० बेड्स, ह.भ.प.कै.मल्हाराव कुटे रुग्णालय आकुर्डी-१३० बेड्स, व भोसरी रुग्णालय -१०० बेड्स नव्याने ४ रुग्णालये २४X७ सुरू करण्यात आले आहेत. तसेच शहरामध्ये २५ ठिकाणी जिजाऊ क्लिनीक, थेरगाव येथे कॅन्सर रुग्णालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पीजी इन्स्टिट्युट येथे एम.बी.बी.एस. कॉलेज सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. अशाप्रकारे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवा सक्षम करण्याकामी कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाकडील नियमानुसार (ससुन रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयाप्रमाणे) महापालिका दवाखाने आणि रुग्णालयामध्ये दर आकारणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार नवीन धोरण करण्यात आलेले असुन त्यास महापालिका महासभेने मान्यता दिलेली आहे. याबाबत नागरिकांनी नोंद घेऊन महापालिकेला सहकार्य करावे, तसेच कोणताही संभ्रम निर्माण होऊ देऊ नये असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.