पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात ‘कॅन्सर हॉस्पिटल’ हे लेखाशीर्ष नव्याने करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागामार्फत शहरात सर्वोपचार सेवा असणाऱ्या वायसीएम रुग्णालयासह 12 रुग्णालये आणि 28 दवाखाने आहेत. या माध्यमातून 1500 खाटांच्या आरोग्य सेवा महापालिका पुरविते. या सुविधांनी सन 2019-20 या आर्थिक वर्षात 19 लाख बाह्य रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली आहे. आरोग्य सेवेच्या पायाभूत सेवेमध्ये श्रेणीवाढ करणे, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविणे, मानांकिकृत प्रणाली प्रक्रिया आणि आचारसंहिता हे महापालिकेचे मुख्य ध्येय आहे. त्या अनुषंगाने थेरगाव येथे महापालिकेमार्फत कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात ‘कॅन्सर हॉस्पिटल’ हे लेखाशीर्ष नव्याने करण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य पिंपरी -चिंचवड शहर अॅनिमियामुक्त करण्यासाठी ‘ॲनिमिया मुक्त पीसीएमसी’ या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. महापालिका हद्दीत हे अभियान सामुदायिक स्तर, शालेय स्तर, महापालिका दवाखाना किंवा रुग्णालय स्तर तसेच खासगी क्लिनिक व हॉस्पिटल अशा प्रत्येक स्तरावर राबविण्यात येणार आहे. त्यासाठीही सन 2022-23 आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात ‘ॲनिमिया मुक्त पीसीएमसी’ हे लेखाशीर्ष नव्याने करण्यात येणार आहे.