महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका आणखी पुढे जाणार

0
5

दि.४ (पीसीबी) -राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. लवकरच या निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर सत्ता यावी म्हणून सर्वच पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवरील जनाधार असलेल्या नेत्यांना कशी ताकद पुरवता येईल, याचा विचार पक्षातील वरिष्ठांकडून केला जात आहे. दरम्यान, आता या निवडणुका दिवाळीनंतर लागणार असल्याचे सांगितले जात असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका पुन्हा लांबणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अजित पवार एका कार्यक्रमात भाषण करत होते. या भाषणादरम्यान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर भाष्य केले. “काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मला ठोस माहिती नाही,” असे भाष्य अजित पवार यांनी केले. तसेचपुन्हा मीच निवडणुका जानेवारी महिन्यात होतील, असा दावा केला जाईल, मला याबाबत ठोस कल्पना नाही, असेही यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी यावेळी लांबत चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही भाष्य केले. निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. 2017 सालानंतर 2022 साली निवडणुका होणे गरजेचे होते. मात्र नंतरची 2022, 2023, 2024 साल गेलं. आता 2025 हे वर्षही संपायची वेळ आली आहे. या निवडणुका लांबण्यामागे काय कारणं आहेत याच्या खोलात मी जात नाही, असे भाष्य अजित पवार यांनी केले. तसेच सर्व घटकांना प्रतिनिधित्त्व मिळायला हवे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आता अजित पवार यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत लांबल्या तर काय होईल? यात कोणकोणत्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असेल, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.