ठाणे, दि 10 (पीसीबी) : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाने महायुतीत लढवून राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र तिन्ही पक्ष स्वबळावर लढवतील, अशी चर्चा रंगली आहे. असे असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे संकेत देत विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची पंचवार्षिक मुदत काही वर्षांपुर्वीच संपुष्टात आली आहे. या सर्वच ठिकाणी प्रशासकीय राजवट अस्तित्वात आली असून प्रशासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरू आहे. काही पालिकांच्या निवडणुका तीन ते चार वर्षांपासून होऊ शकलेल्या नाहीत. या निवडणुका कधी होणार, याविषयी अद्याप स्पष्ट झालेले नाही. सहा महिन्यांपुर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांनंतर येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी चर्चा रंगली आहे. या निवडणुका राजकीय पक्ष स्वबळावर लढणार की युती-आघाडीत लढणार याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाने महायुतीत तर, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस या पक्षांनी महाविकास आघाडीत निवडणुका लढविल्या. या निवडणुकीत महायुतीने मोठे यश संपादन करत राज्यात सत्ता स्थापन केली. असे असले तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढतील, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
असे असतानाच, महायुतीतील शिवसेना पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कशा लढल्या जातील, याविषयी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले आहे. काहीजण म्हणत होते की, सुप्रीम कोर्ट झाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ. पण, विधानसभा निवडणुकीत आपले ६० आमदार निवडुण आल्याने खरी शिवसेना कुणाची हे जनतेने ठरवले. काही जणांना स्वप्न पडले होते. त्यांनी मंत्रीमंडळही तयार केले होते. हाॅटेलही बुक केले होते. पण, जनतेने आणि लाडक्या बहिणींनी त्यांचे बुकींग रद्द केले, असा टोला शिंदे यांनी लगावला.
लाडकी बहिण, भाऊ, शेतकरी, युवक, जेष्ठ अशा सर्वांनी भरभरून मतांचा वर्षाव केला आणि मी सांगत होतो, त्याप्रमाणे विरोधक चारही मुंड्या चीत झाले. आता विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, असे सांगत त्यांनी महायुतीचे संकेत दिले आहेत.