महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकांची रणधुमाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात

0
439

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालिम समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. दिवाळीनंतर राज्यात या ‘मिनी’ विधानसभेचा धुरळा उडण्याची शक्यता असून महापालिका व नगरपालिकांतील प्रभाग रचनेसह ओबीसी आरक्षणाचा तिढा ऑक्टोबरमधेच सुटेल, अशी खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.

दै. सकाळ ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोग पंधरा दिवसांत निर्णय देणार असल्याचे सांगण्यात आले असून निवडणुका होणार असे गृहीत धरुन सर्व राजकिय पक्षांनी हालचाली वाढविल्या आहेत.

राज्यात २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समितीसह २२० नगरपालिका आणि २३ महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची रणनीती राज्य सरकारने आखली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, त्या अगोदरच मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोनाचे कारण देत पुढे ढकलल्या. तर त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून सर्वच निवडणुका पुढे गेल्या. आता सत्तांतर झाल्यानंतर या निवडणुका घेण्यासाठीचे राजकीय डावपेच आखण्यात येत आहेत.

दरम्यान, महापालिका व नगरपालिकांमधील प्रभाग रचनेचा न्यायालयातील वाद आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात दूर होण्याचा विश्वास सरकारला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात या ‘मिनी’ विधानसभा मानल्या जाणाऱ्या निवडणुकांची रणधुमाळी होईल, असे मानले जाते.

याशिवाय, राज्यात सत्तांतरानंतर शिवसेनेत दोन गट पडले असल्याने खरी शिवसेना आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाचे यावरून संघर्ष सुरू आहे. याबाबतचा निकाल देखील ऑक्टोबरच्या २० तारखेच्या अगोदर निवडणूक आयोग देणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

निवडणूक आयोगाकडे चाचपणी
सद्य:स्थिती आणि घटनापीठाचा याबाबतचा निवाडा पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता देऊन धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील त्यांच्याच गटाकडे जाईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील, यासाठीची जय्यत तयारी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे चाचपणी देखील केल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदा २५

पंचायत समिती २८४

नगरपालिका २२०

महानगरपालिका २३