महापालिका कर संकलन विभागाच्या शहरातील 600 गृहनिर्माण सोसायट्यांना नोटीसा

0
190

पिंपरी दि.२२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायटीमधील 50 टक्‍यांपेक्षा अधिक सदनिकाधारकांनी (फ्लॅट) मालमत्ता कराचा भरणा केला नसल्यास फ्लॅट जप्त करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. त्यासाठी शहरातील 600 पेक्षा अधिक सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिवांना पत्र पाठवून सहकार्य करण्याची सूचना केली आहे.

याबाबतची माहिती आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख नीलेश देशमुख यांनी दिली. महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील मालमत्तांचा कर वसुल केला जातो. जास्तीत-जास्त कर वसुलीसाठी पालिकेच्या कर संकलन विभागाने मोहिम हाती घेतली आहे. यापूर्वी शहरातील मोठ्या थकबादीरांना नोटीसा दिल्या आहेत. आता कर थकीत असणाऱ्या फ्लॅटधारकांकडे कर संकलन विभागाने मोर्चा वळविला आहे.

वाकड, थेरगाव, सांगवी, मोशी आणि चऱ्होली या भागातील 600 पेक्षा अधिक गृहनिर्माण सोसायटीमधील 50 टक्‍यांपेक्षा अधिक फ्लॅटधारकांनी कर भरला नाही. त्यामुळे या सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिवांना पालिकेने पत्र पाठविले आहे. या थकबाकीदार फ्लॅट धारकांनी त्वरीत कराचा भरणा करावा. अन्यथा त्यांचा फ्लॅट जप्त करणे, पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा महापालिकेने नोटीसीतून दिला आहे.

महापालिकेचे अधिकृत ओळखपत्र असलेल्या व मालमत्ता जप्ती कारवाईचे अनुषंगाने आदेश, कागदपत्रे इत्यादी असलेल्या संबंधित महापालिका कर्मचाऱ्यांना सोसायटीमध्ये प्रवेश देण्याबाबत सोसायटीतील सुरक्षा रक्षकांना सूचना द्याव्यात. सोसायटीमध्ये प्रवेश देत नसल्याची बाब निदर्शनास आल्यास सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी दिला आहे.