महापालिका आरक्षण सोडतीवर 3 हरकती; शुक्रवारी राजपत्रात आरक्षण प्रसिद्ध होणार

0
357

पिंपरी दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या ओबीसी, सर्वसाधारण जागांच्या आरक्षण सोडतीवर आजपर्यंतच्या मुदतीत 3 हरकती आल्या आहेत. त्यात वाकडचे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांच्या 2 हरकती आहेत. आरक्षण निश्चितीवर प्राप्त झालेल्या या हरकती व सुचनांवर विचार करुन 5 ऑगस्ट रोजी 2022 प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे. 

निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठीच्या आरक्षित जागांसाठी 29 जुलै 2022 चिंचवडमध्ये सोडत काढण्यात आली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोण कोठून लढेल याचे आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. या आरक्षण सोडतीवर इच्छुक, नागरिकांना हरकती व सूचना घेण्याची संधी देण्यात आली होती. आजपर्यंत प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती. मुदतीत केवळ 3 हरकती आल्या आहेत.

वाकड गावठाण प्रभाग क्रमांक 38 मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. ओबीसी आणि सर्वसाधारण महिला पडल्याने विद्यमान नगरसेवक असलेल्या शिवसेनेचे राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे यांची निवडणूक लढविण्याची संधी हिरावली गेली आहे. आरक्षण सोडतीवर मयूर कलाटे यांनी 2 हरकती नोंदविल्या आहेत. त्यांच्यासह आणखी 1 हरकत आली आहे.