महापालिका आयुक्त शेखर सिंह ‘या’ दिवशी नागरिकांना भेटणार

0
158

पिंपरी दि.१४ (पीसीबी) – महापालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह नागरिकांना भेटणार आहेत. आयुक्तांनी भेटण्यासाठी वेळ निश्चित केल्याने नागरिकांचा हेलपटा वाचणार आहे.

महापालिकेच्या संबंधित कामकाजाकरिता मुख्य कार्यालयात दररोज काही नागरिक कामकाजाच्या निमित्ताने आयुक्तांकडे भेटीसाठी समक्ष येत असतात. परंतु, आयुक्तांकडे महापालिकेशीसंबंधित विस्तृत स्वरूपाचे कामकाज असल्याने काही प्रसंगी महापालिका संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्या समवेत बैठका आयोजित केलेल्या असतात. अत्यावश्यक कामकाज चालू असते. परिणामी, कामकाजानिमित्त भेटीस आलेल्या नागरिकांना भेटण्यासाठी वेळ देता येत नाही.

नागरिक विविध कामे घेवून आयुक्तांना भेटण्यासाठी येतात. आयुक्त बैठकीत असल्याने नागरिकांना भेटीविना परत जावे लागते. नागरिकांचा हेलफाटा होतो. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवला आहे.

आठवड्यातील कार्यालयीन कामकाजाच्यादिवशी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत आयुक्त नागरिकांना भेटतील. आयुक्त काही प्रसंगी अन्य शासकीय कार्यालय, मंत्रालय मुंबई अथवा महापालिका सभा, स्थायी समिती, विधी समिती सभांकरिता सभागृहामध्ये उपस्थित असतात. त्यामुळे अशा प्रसंगी आयुक्त नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत, असे प्रशासनाने आज (गुरुवारी) काढलेल्या आदेशात म्हटले आहे.