पिंपरी दि. १४ (पीसीबी) – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनातही बदल होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दोघांच्याही कार्यपद्धतीबाबत नव्या सरकारकडे तक्रारी गेल्याची माहिती आहे. आयुक्त पाटील आणि ढाकणे यांनी काल अचानक धावतपळत मुंबई दौरा केला. त्यामुळे चर्चेला अधिक उधाण आले आहे. त्यामुळे लवकरच दोघांचीही बदली होईल, अशी जोरदार चर्चा महापालिका प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.
ओडिशा केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी 15 फेब्रुवारी 2021 रोजी नियुक्ती झाली. पाटील प्रतिनियुक्तीने 5 वर्षासाठी महाराष्ट्रात आले आहेत. तर, भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (IRPFS) विकास ढाकणे यांचीही 15 फेब्रुवारी 2021 रोजीच महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली. दोघांनीही एकाचदिवशी पदभार स्वीकारला. आयुक्त पाटील रुजू झाले तेव्हा महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यांना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठविले होते. त्यामुळे स्थानिक भाजपशी आयुक्तांना लवकर जुळवून घेता आले नाही.
सुरुवातीला आयुक्त भेटण्यासाठी वेटिंगवर थांबवत असल्याचे आरोपही नगरसेवकांनी केले. आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरुन खटके उडाले होते. महापालिका सभागृहात उत्तर देतानाही आयुक्तांच्या तोंडून चुकीचा शब्द गेला होता. तसेच स्पर्शचा अहवाल सभा पटलवार ठेवण्यावरुनही नगरसेवकांनी धारेवर धरले होते. तर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या कार्यपद्धीतवरही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आयुक्त राजेश पाटील यांचीच प्रशासकपदी नियुक्ती केली.
प्रशासक होताच तत्कालीन आयुक्तांनी सत्ताधारी भाजपने सुमारे नऊ महिने तहकूब ठेवलेला वादग्रस्त शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या विषयाला पहिल्याच बैठकीत मान्यता दिली. महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाकरिताच्या इमारतीसाठीची 312 कोटी 20 लाख 32 हजार 838 रुपये खर्चाची निविदाही प्रसिद्ध केली. महापालिका रुग्णालयातील कर्मचा-यांचे आऊटसोर्सिंग केले. तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कलानुसारच कारभार, ‘दादा बोले आयुक्त डोले’ असा झालेला आरोप, राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना झुकते माप दिल्याची चर्चा झाली. प्रभाग रचनाही राष्ट्रवादीला झुकती केल्याचा आरोप झाला.
वारंवार उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले. प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांना महत्वाचे विभाग दिल्याचा आरोप होतो. मोशीतील कचरा डेपोच्या आगीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. शहरातील पाणी प्रश्न जैसे थे असून तो सोडविता आला नाही. केवळ स्वच्छता अभियान, रंगरंगोटी, सुशोभीकरण अशा कामावर भर दिला. केवळ तकलादू, प्रसिद्धीची कामे केल्याचा आरोप झाले. प्रशासनावर वचक नाही. अशा आयुक्तांबाबतच्या विविध तक्रारी नवीन सरकारकडे गेल्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आयुक्त पाटील यांची लवकरच बदली होईल अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
तर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हे रेल्वे सेवेतून महापालिकेत आले आहेत. ढाकणे समांत्तर आयुक्तालय चालवित असल्याचा सातत्याने आरोप होतो. त्यांच्या कार्यपद्धतीबाबतही अनेकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकार आयुक्त, अतिरिक्त आयुक्त दोघांचीही बदली करेल असे बोलले जाते. दरम्यान, याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ”प्रशासनात काम करताना बदली हा नियमित भाग आहे. माझी आणखी 22 वर्षे सेवा आहे. बदली होईल याबाबत मी काहीच बोलू शकत नाही”.