दि.१४ (पीसीबी) -मंत्री दादा भुसे यांचे भाचे जावाई आणि महापालिकेचे निवृत्त आयुक्त अनिलकुमार पवार यांना मोठ्या गरव्यवहार प्रकरणात ईडी कडून अटक करण्यात आली आहे. तब्बल ४१ इमारत अनधिकृत बांधकाम घोटाळा प्रकरणी माजी आयुक्त अनिलकुमार पवार, तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यासह अन्य दोन जणांवर बुधवारी संध्याकाळी सक्तवसुली संचनालयाने अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच हादरले आहे. तर अन्य अधिकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसई विरार शहरात ४१ अनधिकृत बांधकाम प्रकरणानंतर शहरातील बांधकाम घोटाळ्याची प्रकरणे ईडीच्या तपासातून समोर आली आहेत. २९ जुलै रोजी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात एक कोटी ३३ लाख रुपये व कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. त्यांच्या झालेल्या चौकशीत बांधकाम घोटाळ्यात पवारांचा थेट सहभाग असल्याचे ईडीने जाहीर केले होते.
विशेषतः अनिलकुमार पवारांचा या प्रकरणात वसुलीचा दरही ठरला होता. बांधकाम प्रकल्पातील एकूण क्षेत्रफळावर प्रती चौरस फुटाला २० ते २५ रुपये आयुक्तांना तर वादग्रस्त नगररचना अधिकारी वाय.एस. रेड्डी यांना प्रती चौरस फुटामागे १० रुपये याप्रमाणे लाच घेतली जात होती. या प्रकरणानंतर पवारांची ईडी कडून चौकशी सुरू करण्यात आली होती. या प्रकरणात पवार यांचा थेट सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर बुधवारी ईडीने माजी आयुक्त अनिलकुमार पवार, माजी नगररचना उपसंचालक वायएस रेड्डी, बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता व अरुण गुप्ता अशा चार जणांना अटक केली आहे.
विशेषतः यात महापालिकेचे माजी आयुक्तांनाच अटक झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून राज्यासह शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनिलकुमार पवार हे ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आलेले आयएएस दर्जाचे पाहिलेच अधिकारी ठरल्याचे बोलले जात आहे . त्यामुळे पवार यांनी केलेल्या घोटाळ्याची चर्चा ही आता राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.