महापालिका आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा भरविणार

0
302

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तसेच फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी यांच्या मान्यतेने आणि  हॉकी इंडिया व  हॉकी महाराष्ट्र यांच्या सहकार्याने  पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयम येथे 6 राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या अंदाजे 11 कोटी रुपये खर्चासह स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे 24 कोटी 11 लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना आजच्या बैठकीत प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.  

आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा येत्या सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे नियोजन असून त्यासाठी विविध विभागामार्फत सोयी सुविधा तसेच कामे करण्यासाठी होणा-या खर्चास प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.  स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.   ‘अ’ प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी  98 लाख 46 हजार रुपये खर्च होतील.

शहरातील विविध ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकणे तसेच दुरुस्तीविषयक कामे करण्यासाठी सुमारे 7 कोटी 73 लाख रुपये खर्च केले जाणार आहे.  यामध्ये  प्रभाग क्र. 12 मधील रुपीनगर तसेच तळवडे गाव परिसरातील आवश्यकतेनुसार जलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे , प्रभाग क्र.25 मधील वाकड, ताथवडे, पुनावळे भागात नविन जलनिःसारण नलिका टाकणे,  प्रभाग क्र.22 काळेवाडी येथील विजयनगर, अष्टविनायक कॉलनी परिसर, परमवीर कॉलनी, साईश्रध्दा कॉलनी परिसरामध्ये जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे,

प्रभाग क्र. 8 इंद्रायणीनगर येथे सेक्टर क्र. 7, 9, 10, 11, 13 येथे जलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा कामे करणे तसेच नविन विकसित होणा-या भागात आवश्यकतेनुसार नविन ड्रेनेज लाईन टाकणे, मलनि:सारण विभागाकडून करण्यात आलेल्या कामाअंतर्गत रस्ते पुर्ववत करणे, प्रभाग क्र.3 येथे च-होली गांव, काळजेवस्ती, पठारेमळा, बुर्डेवस्ती, साई मंदिर, वडमुखवाडी, चोविसावाडी, काटे कॉलनी, काळजेवाडी, काळजेनगर परिसरात व इतर ठिकाणी मलनि:सारण विषयक कामे करण्यासाठी,  प्रभाग क्र.21 पिंपरी मधील अशोक थिएटर, डिलक्स टॉकिज व इतर परिसरातील जलनि:सारण नलिका टाकणे व जलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा कामे करण्यासाठी,  प्रभाग क्र.11 अजंठानगर, भिमशक्तीनगर, पूर्णानगर, शिवतेजनगर परिसरात आवश्यकतेनुसार जलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामांसाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.