महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मिळणार 8.33 टक्के सानुग्रह अनुदान, 20 हजार जादा रक्कम

0
178

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना दिवाळीसाठी 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि 20 हजार रुपये जादा रक्कम देण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला आहे. त्यामुळे साडेआठ हजार कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्यात गेल्यावर्षी पंचवार्षिक वेतन करार झाला आहे. 2020-21 ते 2024-25 पर्यंत हा करार आहे. गेल्यावर्षी झालेल्या करार करताना पाच हजार रुपयांनी सानुग्रह अनुदानात वाढ केली होती. त्यानुसार वर्ग 1 ते 4 मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि जादा 20 हजार रुपये रक्कम देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. या बोनसचा महापालिकेतील साडेआठ हजार कर्मचा-यांना लाभ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शाखाधिकारी व शाखाप्रमुख यांनी 2022-23 च्या अंदाजपत्रकामध्ये सानुग्रह अनुदान व जादा रक्कम अदाईगी करण्याच्या लेखा शीर्षकाखाली केलेली तरतूद अपुरी पडल्यास तरतूद वर्गीकरणाची कारवाई करावी. तसेच 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि जादा 20 हजार रुपये रक्कम सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी मिळेल याची दक्षता घ्यावी. त्याबाबतची बिले तयार करून तातडीने लेखा विभागाकडे सादर करावीत. लेखा विभागाने तातडीने बिले तपासून रक्कम अदाईगी संदर्भातील कार्यवाही करावी.बिलांच्या विलंबाबाबत शाखा प्रमुखांना जबाबदार धरण्याचा इशारा आयुक्त सिंह यांनी दिला आहे.