महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज

0
292

पिंपरी दि.५ (पीसीबी)- महापालिकेच्या वतीने कामगार कल्याण निधीचे सभासद असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज म्हणून वर्ग 1 ते 4 साठी १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. या कर्जाची परतफेड एकूण 10 ते 20 मासिक समान हप्त्यांमध्ये वेतनातून कपात करण्यात येणार आहे. तसेच, कामगार कल्याण निधी वर्गणी म्हणून वर्ग 1 व 2 चे अधिकारी यांच्या वेतनातून दरमहा 80 रुपये व वर्ग 3 व 4 यांच्या वेतनातून 50 रुपये कपात करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीकरीता कामगार कल्याण निधी स्थापन करण्यात आला आहे. 30 एप्रिल 2022 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी बहुमताने धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सभासदांनी मागणी अर्ज संबंधित शाखाप्रमुख / विभागप्रमुख यांच्या शिफारशीसह शैक्षणिक वर्षातील माहे जून ते डिसेंबर या कालावधीत कागदोपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.

कामगार कल्याण निधी सभासदांचे पाल्य हे उच्च शिक्षण परदेशात घेत असतील, तर सभासदांचा सेवा कालावधी विचारात घेऊन शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करून जास्तीत जास्त 3 लाख रुपये कर्जाऊ अर्थसहाय्य बिनव्याजी परतफेडीचे मंजूर करण्यात येणार आहे. कर्जाची संपूर्ण वसुली झाल्यावर पुढील शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक कर्ज देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. एका वेळी एकाच पाल्यास शैक्षणिक कर्जास मंजूरी मिळेल. तसेच कामगार कल्याण निधी सभासद असलेल्या व मयत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना 25 हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात येणार आहे. नवीन नेमणूक झालेल्या नियमित कर्मचारी यांना कामगार कल्याण निधीचे सभासद झाल्यानंतरच योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व नियमित अधिकारी / कर्मचारी आणि शिक्षण विभागातील कर्मचारी यांना सभासद होणे गरजेचे आहे. त्यासाठी कामगार कल्याण निधी वर्गणी वसुलीबाबत संबंधित शाखाप्रमुख / विभाग प्रमुखांनी प्रशासन विभागास तात्काळ कळविणे आवश्यक आहे. संबंधित विभागप्रमुखांनी ऑगस्ट 2022 चे वेतनापासून कामगार कल्याण निधीचे सभासद असलेल्या वर्ग 1 व 2 चे अधिकारी यांच्या वेतनातून दरमहा 80 रुपये तसेच वर्ग 3 व 4 चे कर्मचारी यांच्या वेतनातून दरमहा 50 रुपये इतकी कामगार कल्याण निधी वर्गणी कपात करावी. जमा होणा-या रक्कमेचा तपशील लेखा विभागाने दरमहा कामगार कल्याण विभागाकडे सोपविण्यात यावा, अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आलेल्या आहेत.