महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी IAS अधिकारी नियुक्तीच्या हालचाली

0
186

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त 1 या पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी (आयएएस) अधिका-याचीच प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. आयुक्त शेखर सिंह यांनी शासनाला पत्र पाठवून अतिरिक्त आयुक्त 1 पदी आयएएस अधिका-याची प्रतिनियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला आहे. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले. महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली.

यापूर्वी महसूल सेवेतील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिका-यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती होत होती. परंतु, मागील काही वर्षात रेल्वे सेवेतील विकास ढाकणे, राज्य कर सेवेतील प्रदिप जांभळे, मुख्याधिकारी संवर्गातील स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली. जांभळे यांची महाराष्ट्र प्रशासकीय लवादने (मॅट) नियुक्ती रद्द केली आहे. त्यांच्या जागी झगडे यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाला दिले आहेत. पण, जांभळे यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तपदाचा वाद काही केल्या संपुष्टात येत नाही. अतिरिक्त आयुक्त एक पदाच्या सुरू असलेल्या वादावरून महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे.

यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी 28 डिसेंबर 2022 रोजी महापालिका अतिरिक्त आयुक्त एक या पदावर प्रतिनियुक्तीने राज्य शासनाकडून वेळोवेळी नेमणूक करण्यात येईल असा अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेतील असावा. तसेच अतिरिक्त आयुक्त दोन या पदावर शासनाचे सह सचिव, उपसचिव दर्जाचे, मुख्य अधिकारी (निवडश्रेणी) किंवा समकक्ष वेतनश्रेणीतील अधिका-याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल. अतिरिक्त आयुक्त तीन या पदावर स्थानिक अधिका-यांमधून पदोन्नतीने नियुक्ती करता येईल. याप्रमाणे नव्याने पद निर्मिती करुन अतिरिक्त आयुक्त पदाचे नेमणूक अर्हता व वेतनश्रेणी दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे परवानगी मागितली.

त्याचबरोबर पालिका आस्थापनेवरील अभियांत्रिकी विभागाच्या आकृतीबंधामध्ये मुख्य अभियंत्याची दोन पदे निर्माण केली जाणार आहेत. शहर अभियंता या पदाला समकक्ष ही पदे असतील. या पदांची व संवर्गाची अर्हता, सेवाप्रवेश, नियम, वेतनश्रेणीस मान्यतेसाठीही प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. त्यावर शासनाने 14 फेब्रुवारी 2023 रोजी पालिकेला पत्र पाठविले आहे. पदनिर्मिती व वेतनश्रेणी बदलामुळे महापालिकेवर पडणारा आर्थिक खर्चाचा तपशील, मुख्य अभियंता पदाची आवश्यकता, त्याबाबतचे निकष, कर्तव्य जबाबदा-याचा तपशील याची माहिती मागविली आहे.