महापालिकाच खासगी तत्त्वाव चालविण्यास द्या – अजित गव्हाणे

0
193

जलशुद्धीकरणाच्या खासगीकरणावरून आयुक्तांवर घणाघात

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) :- महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक हे लोकप्रतिनिधी नसल्याचा फायदा घेत मनमानी पद्धतीने निर्णय घेत आहेत. शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र भाजप नेत्यांचे ठेकेदार पोसण्यासाठी खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय हा अत्यंत गंभीर असून प्रशासन चालविणे होत नसेल तर संपूर्ण महापालिकेचेच खासगीकरण करून ती चालवायला द्या, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर घणाघात केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निगडी येथील सेक्टर क्रमांक २३ मध्ये जलशुद्धीकरण केंद्र आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून पाणीपुरवठा विभागाकडूनच हे केंद्र चालविले जात आहे. मात्र, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी हे खासगी ठेकेदाराला चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अजित गव्हाणे यांनी प्रखर विरोध करत हे जलशुद्धीकर केंद्र खासगी ठेकेदाराला चालविण्यास देऊ नये, अशी मागणी केली आहे.

याबाबत गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, जलशुद्धीकरण केंद्र हा अत्यंत गंभीर आणि प्रत्येक शहरवासियाशी संबंधित विषय आहे. जलशुद्धीकरण केंद्रातूनच संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा होत आहे. भविष्यात खासगी ठेकेदार जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शहराला वेठीसही धरू शकतो. त्याच्या बेजबाबदारी अथवा मनमानीचा फटकाही शहरवासियांना बसू शकतो. शिवाय ठेकेदारावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटनाही होण्याची भिती आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हा पाण्यासारख्या अत्यावश्यक बाबीचा विषय असल्यामुळे आयुक्तांनी त्याबाबत शहरवासियांची मते जाणून घेणे महत्त्वाचे होते. आयुक्त शेखर सिंह हे महापालिका स्वत:ची खासगी मालमत्ता असल्यासाखरे निर्णय घेत आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे खासगीकरण ही बाब अत्यंत दुर्देवी आणि तितकीच गंभीर बाब असल्याने आयुक्तांनी हा निर्णय तात्काळ रद्द करावा. हा निर्णय रद्द न केल्यास, आयुक्तांच्या निर्णयाविरोधात शहरावासियांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही गव्हाणे यांनी दिला आहे