महापारेषण अधीक्षक अभियंत्याकडून महिलेचा विनयभंग

0
180

पुणे, दि.१० (पीसीबी): महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या दिव्यांग महिलेला मानसिक त्रास देत तिचा वारंवार विनयभंग केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेमुळे महावितरण मध्ये खळबळ उडाली आहे. समर्थ पोलीस ठाण्यामध्ये अधीक्षक अभियंत्यासह त्याच्या दोन सहकाऱ्याविरोधात भारतीय दंड विधान ३५४ (अ), ५०९, ५०४, ५०६ यासह अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम ९२ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार नोव्हेंबर २०२२ पासून आज पर्यंत घडला. याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

अधीक्षक अभियंता प्रकाश कुरसंगे (वय ४८ ,रा. विमान नगर) स्नेहल बोंद्रे (वय ३६, रा. कोथरूड), विकास धावारे (वय ३०) धायरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी मर्यादित रास्ता पेठ येथील अतिउच्च दाब संचलन आणि सुव्यवस्थापन प्रकल्प मंडळ विभागात कुरसंगे हा अधीक्षक अभियंता म्हणून काम करतो. त्याच्याच कार्यालयामध्ये पीडित महिला काम करते. आरोपीने फिर्यादीला वारंवार कामात त्रास दिला. तिच्याकडे पाहून अश्लील हातवारे केले. तसेच, स्वतःच्या लैंगिक अवयवांच्या जागेवर खाजवून तिला अश्लील शिवीगाळ केली. तिचा वारंवार विनयभंग केला. तिला अन्यत्र बदली करण्याची देखील धमकी देण्यात आली.

यासोबतच स्नेहल बोंद्रे आणि विकास धावारे यांनी ही महिला दिव्यांग असल्यामुळे तिचा तिरस्कार केला. विकास याने ही महिला बसत असलेल्या खुर्चीवर वेळोवेळी जाणीवपूर्वक खाज येणारी पावडर टाकून टाकली. त्यामुळे या महिलेच्या अंगाला खाज सुटून शारीरिक त्रास देखील झाल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.