महापरीनिर्वाण दिन, 5 डिसेंबर रोजीचा शपथविधी सोहळा पुढे ढकला – सचिन खरात यांची मागणी

0
66

मुंबई, दि. 30 (पीसीबी) : विधानसभेत घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुती पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली करत आहे. येत्या 5 डिसेंबररोजी शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. मात्र, या तारखेला शपथविधी ठेऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी ही मागणी केली आहे.

यासंदर्भात सचिन खरात यांनी थेट राज्यपालांकडे मागणी केली आहे. 6 डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन आहे. या दिवशी आंबेडकरी अनुयायी दु:खात बुडालेली असतात. त्यामुळे 5 डिसेंबर रोजीचा शपथविधी सोहळा पुढे ढकलावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सचिन खरात यांची मागणी-
6 डिसेंबर रोजी संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबरच्या अगोदरच आंबेडकरी अनुयायी दुःखात बुडून गेलेले असतात. त्यामुळे 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम करू नये, असं सचिन खरात म्हणाले आहेत.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा हा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार असल्याचं म्हटलं जातंय. 28 नोव्हेंबररोजी दिल्लीमध्ये महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. याच बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली आहे.

5 डिसेंबररोजी शपथविधी सोहळा पार पडणार?
एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. अजित पवार यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद तसेच अगोदर जी खाती होती तीच खाती मिळणार असल्याचं समजतंय. तर, एकनाथ शिंदे यांनी भाजपाला गृहखातं मागितलं आहे. तर, नगरविकास खातं सोडण्यास शिंदे गट तयार आहे. मात्र, भाजपा एकनाथ शिंदेंना गृहखातं देण्यास तयार नाही. भाजपाने उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रीपद मिळणार, अशा दोन ऑफर्स शिंदे यांच्यासमोर ठेवल्याची माहिती आहे.