महापत्रकार परिषदेतून ठाकरेंची बाजी, नार्वेकरांची गोची

0
475

हिंदुत्ववादी मतांची विभागणी नको म्हणून ठाकरेंची शिवसेना संपविण्याचा भाजपचा अजेंडा आता मोदी-शाह यांच्या अंगलट येणार असे संकेत आहेत. कारण महाराष्ट्र, मराठी माणूस आणि शिवसेना असे एक घट्ट समिकरण आहे. गुजराथ लॉबिने मराठी अस्मितेला मारलेला डंख भाजपला परवडणार नाही. पूर्वी काँग्रेस राजवटीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायमचे बंद करण्याचा प्रयत्न झाला होता. उलट त्याचा परिणाम संघ दुप्पट क्षमतेने वाढला. इथे आता तेच शिवसेनेचे होताना दिसते. एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना फोडून निवडणूक आयोगाचा वापर करून नाव, चिन्ह गोठवून अगदी विधानसभा सभापतींचाही वापर करून सेना संपविण्याचा आटापिटा केला गेला. कालची उध्दव ठाकरेंचा महापत्रकार परिषद आणि नंतर त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेली स्पष्टीतरण जनतेने पाहिले. एका वाक्यात सांगायचे तर, इथे ठाकरेंनी बाजी मारली आणि नार्वेकर अक्षरशः उघडे पडले. मराठी माणसाच्या अस्मितेला कोणीही आणि विशेषतः गुजराथ्यांनी चिरडण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि सहन करणार नाही. पाच पन्नास हजार रुपयांचे कर्ज परतफेड करता आले नाही तर, कुटुंबाची इज्जत जायला नको म्हणून गळफास घेणारा मराठी शेतकरी कुठे आणि लाखो कोटींचे कर्ज बुजवून परदेशात धूम ठोकणारे निर्लज्ज गुजराथी उद्योजक, हाच फरक आहे. पैशाने माणसे विकत घेता येतात अस्मिता नाही. विकले जाणाऱ्या चार-दोन शिंदे, नार्वेकरांना मराठीत आजचे सुर्याजी पिसाळ संबोधतात. थोडक्यात सांगायचे तर, ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांची शिवसेना खोटी ठरविण्याचा जो प्रयत्न भाजपने केला तो पुरता उघडा पाडला आहे. एबीपी माझा या चॅनलने याच विषयावर म्हणजे ठाकरे-नार्वेकर वादावर जनमताचा कौल मागवला होता. त्यांच्या फेसबूक, व्हाटसएप, इन्स्टाग्राम अशा सगळ्या सोशल मीडियावर लोकांनी ठाकरेंच्या बाजुने जवळपास ७० टक्के कौल दिला. नार्वेकरांच्या निकालावर राज्यातील प्रमुख दैनिकांचे अग्रलेख आणि राजकीय विश्लेषकांनी मतप्रदर्शन करतानाही न्यायाचा तराजू ठाकरेंच्याच बाजुने झुकत असल्याचे मत मांडले. मोदी-शाह यांनी कितीही कोंबडे झाकून ठेवले तरी सुर्य उगवायचा राहणार नाही.

राहुल नार्वेकर यांच्या निकालाची जाहिर चिरफाड झाल्याचे उभ्या मराहाष्ट्राने पाहिले. शिवसेनेच्या जनता न्यायालयात जेष्ठ वकिलांनी केलेला युक्तीवाद लोकांना भावला. आक्रमक शिवसेनेचा पुनर्जन्म झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यापूर्वीच्या अनेक बंडानंतर आक्रमक शिवसेना समोर आली होती. शिंदेच्या बंडात ही आक्रमक शिवसेना दिसली नाही, कुठे गेली, असा प्रश्न होता. आज शिवसेनेने आक्रमकतेबरोबर अचुक टायमिंग साधले. ही आक्रमकता वकिली भाषेत समजवून सांगण्यात शिवसेनेच्या वकिलांना यश आल्याचे दिसले.

राजकीय लोकशाहीत जनतेच्या न्यायालयातील निकाल हाच सर्वोच्च असतो. त्याचा योग्य वापर शिवसेना थिंक टँकने केल्याचे चित्र होते. हे करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच बरोबर दोन वकील अॅड. राहूल नार्वेकर, अॅड.देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे वकिल असिम सरोदे यांनी केलेल्या वकिली भाषेत गंभीर आरोपसुध्दा लोकांना पटलेत.

अयोध्येतील राम मंदिर उदघाटनाचे देशभर वातावरण आहे. देशात सामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नुकतीच सुरु झालेली न्याय यात्रा. राहूल नार्वेकर यांचा आलेला निकाल, अशा तीन महत्वाच्या गोष्टींना समोर ठेवत शिवसेनेने देशात पहिल्यांदाच जनता न्यायालयात एखाद्या लवादाच्या निकालाची जाहिरपणे चिरफाड केली. अशा प्रकारे न्यायालयाच्या निकालाची चिरफाड करण्याचे अस्त्र आज असिम सरोदे यांनी लोकशाहीत सामान्य जनतेला असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांची दावोस वारी, शिंदे गटाच्या आमदारांचा नार्वेकर विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणे आणि सर्वोच्च न्यायालयात मुळ प्रकरण प्रलंबित असताना व या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापुर्वी साधलेले हे अचुक टायमिंग शिवसेनेच्या राजकीय खेळीचा महत्वाचा भाग ठरेल. असिम सरोदे यांनी जनता न्यायालयात महत्वाचे मुद्दे सांगताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांनी कायदा इंटरेस्टींग केल्याचा आरोप केला. मुळ राजकीय पक्षाद्वारे नियुक्त गटनेता अजय चौधरी यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविली होती. त्याच बरोबर एकनाथ शिंदे यांची नियुक्त राजकीय पक्षाद्वारे न झाल्याने त्यावर ताशेरे ओढले होते. इतकेच नाही फुटलेल्या गटाद्वारे भरत गोगावले यांची गटनेता पदाची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविली असताना त्या आधारे दहाव्या परिशिष्टाप्रमाणे अपात्रतेचा दिलेला निर्णय वैध कसा असा प्रश्न असिम सरोदे यांनी उपस्थित केला.

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस च्या निकालानंतर अशाच प्रकारे चिरफाड होण्याचे ट्रेलर आज दाखविण्यात आले. इतकेच नाही तर मुळ राजकीय पक्ष आणि विधीमंडळ राजकीय पक्ष यांची भूमिका विषद करत क्लिष्ट विषय आज सोपा केला. त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होतील. भाजपसाठी ते मोठे चॅलेंज आहे.

मुळ राजकीय पक्षच व्हीप काढू शकतो. पक्षात फूट पडल्यानंतर दूसऱ्या राजकीय पक्षात विलीनीकरणाची गरज होती. त्यांनी गट स्थापन करण्याची आवश्यकता होती. ती न केल्याने ते शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतात. शिंदे गट टप्प्या टप्यात फुटला, दोन तृतीयांश आमदारांची एकत्रित फुट नव्हती. त्याच बरोबर विधानसभा अध्यक्ष पदावर असताना राहुल नार्वेकर यांनी भाजपा सदस्य पदाचा राजीनामा दिला नसल्याचा दावा सरोदे यांनी केला. पक्षांतर बंदी कायद्यात पक्षांतर थांबविणे हा मुळ उद्देशच पाळला गेला नाही. एकनाथ शिंदे लिडर म्हणून अपात्र असताना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्यात आले नाही. ही नार्वेकरांची मोठी चूक असल्याचा दावा सरोदे यांनी केला. न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार वाढल्याचे, त्याच बरोबर लोकशाही आणि संविधानाची ही हत्या असल्याचा आरोप सरोदे यांनी केला. याचे सविस्तर उत्तर नार्वेकर आणि शिंदे यांना द्यावे लागेल. केवळ तोंडी उत्तर नाही तर ज्या प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेने वेगवेगळ्या मुद्यांची चिरफाड केली अगदी त्याची उत्तरे पुराव्यानिशी द्यावी लागतील.

अॅड.अनिल परब यांनी थेट शिवसेनेच्या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारणीचा व्हिडीओ समोर आणत त्याच बरोबर त्यानंतर निवडणुक आयोगाने स्विकारलेले कार्यकारणीचे पत्रव्यवहार मांडला. इतकेच नाही तर निवडणुक आयोगाने उध्दव ठाकरे यांना वेळोवेळी पाठविलेले पत्र, त्याच बरोबर पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांचा मोदी सरकारला दिलेला पाठिंबा,पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांनी त्या त्या निवडणूकीत वाटलेले एबी फार्म याचा उल्लेख करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच कसे योग्य आहेत याचा पुराव्यानिशी सादरीकरण केले. सर्वच मुद्दे सामान्य जनतेला अपिल होणारे होते. कायदेशीर बाजू भक्कम असल्याने हे सादरीकरण देखील प्रभावी झाले.

उध्दव ठाकरे यांनी लबाड म्हणत लवादावर उपस्थित केलेला प्रश्न आणि विदर्भातील गझलसम्राट सुरेश भटाच्या ओळी ‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्याविना मढ्याला आता उपाय नाही…’ या सांगितलेल्या ओळींनी विद्यमान लोकशाही, राजकीय व्यवस्थेची चिरफाड करणारी ठरली.

दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री हे तिथून या प्रश्नांची उत्तरे देतील की, महाराष्ट्रात परत आल्यावर उत्तर देतील हा कळीचा मुद्दा आहे. इतकेच नाही तर पुढील काळात अयोध्येतील राम मंदिर उदघाटन सोहळा असताना आजच्या जनता न्यायालयातील प्रश्नांची उत्तरे देण्याचे धाडस शिंदे गट दाखविणार का हे पाहण्यासारखे ठरेल.

दोन्ही बाजुंचा युक्तीवाद तमाम महाराष्टाराने पाहिला. ठाकरेंनी बाजी मारली असेच म्हणावे लागेल. राहुल नार्वेकर यांनी केलेले लंगडे समर्थन कोणलाही पटलेले नाही. खरे खोटे आता सर्वोच्च न्यायालयात होईल पण, ही संपूर्ण खेळी भाजपला महाग पडणार असे दिसते. आगामी लोकसभा निवडणुकित शिंदे, अजित पवार यांच्या मदतीने ४८ पैकी ४२ जागा जिंकू पाहणाऱ्या महायुतीला मोठा तडाखा देणारेच हे प्रकरण आहे. पुरोगामी, सुधारणावादी, प्रगत महाराष्ट्र म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेश नव्हे हे मोदी-शाह यांना समजायला पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्र गुजराथच्या पंथाला लावण्याच्या डावपेचात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक कर्तबगार नेता, चांगला मोहरा बाद होणार याचीही खंत आहे. मराठी माणूस भडकला तर काय होते ते आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकित दिसेल.