महानगरपालिकेतील वाहनचालकाचा मुलगा भारतीय नौदल सेनेत सब लेफ्टनंट पदावर

0
438

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) :- महापालिकेतील कर्मचारी त्यांच्या उत्तम सेवेचे योगदान कार्यालयीन कामकाजात देत आहेत, तसेच त्यांच्या मुलांनी देखील केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे महापालिकेच्या लौकीकात भर पडली असून त्यांचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

महानगरपालिकेतील वाहनचालक बालाजी अय्यंगार यांचा २३ वर्षीय मुलगा प्रणव अय्यंगार यांची नुकतीच भारतीय नौदल सेनेत सब लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात आली. तमिळनाडू येथे जन्मलेल्या सब लेफ्टनंट प्रणव अय्यंगार यांची आधीपासूनच सैन्यदलात काम करण्याची इच्छा होती. त्यांचे वडील नेहमी त्यांना स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी युद्ध स्मारकावर घेऊन जायचे त्यामुळे तेथील रुबाबदार गणवेशातील पदक धारण केलेले अधिकारी पाहून प्रणव यांना सैन्यदलात अधिकारी होण्याची इच्छा झाली. यासाठी त्यांनी १० वी नंतर एनडीएची परीक्षा दिली पण त्यांना या परिक्षेत यश आले नाही, पण त्यांनी हार मानली नाही आणि इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर पुन्हा २०२१ साली संयुक्त सेवा सुरक्षा परीक्षा पास केली. परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रणव यांनी एझिम, केरळ येथील इंडियन नेव्हल अकादमी येथे दीड वर्षे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेतल्यानंतर एकुण गुणवत्तेमध्ये त्यांना श्रीलंका नौसेनेचे व्हाईस ऍडमिरल प्रियंथा परेरा यांच्या हस्ते रौप्य पदक देण्यात आले. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०२३ रोजी नौदल प्रमुख आर. हरी कुमार यांच्या उपस्थितीत प्रणव अय्यंगार यांना सब लेफ्टनंट ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी प्रणव यांनी नौदल प्रमुख होण्याची इच्छा व्यक्त केली.

तर मुख्य लेक्षा परिक्षण विभागातील आत्माराम माने यांचा मुलगा अभिषेक माने यांनी दक्षिण अमेरिकेतील इलो, पेरू येथे झालेल्या मिस्टर प्लॅनेट युनिव्हर्स २०२३ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विविध देशातील १५ स्पर्धकांमधून द्वितीय उपविजेतेपद मिळवून जागतिक मंचावर पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचावले. यासोबतच त्यांनी मिस्टर प्लॅनेट कॉपर वर्ल्ड हा खिताबही जिंकला. याआधी मिस्टर प्लॅनेट युनिव्हर्स २०२३ उपांत्य फेरीदरम्यान मिस्टर प्लॅनेट एशिया २०२३ चे विजेतेपदही त्यांनी पटकावले होते.

मुख्य लेखा परिक्षण विभागातील उपलेखापाल दिप्ती हांडे यांचा मुलगा यशराज हांडे याने १७ वर्षीय जिल्हास्तरीय ओपन साईट एयर रायफल शुटींग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संवाद साधताना यशराजने लहानपणापासूनच नेमबाजीचे आवड असल्याचे सांगून आंतरराष्ट्रीय नेमबाज होण्याची इच्छा व्यक्त केली