महानगरपालिका प्रशासनाकडून ७ होर्डिंग धारकांचे परवाने रद्द…

0
161

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) : शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करुन त्याचे संगोपण सुध्दा केले जाते. शहर सुंदर स्वच्छ व हरित करण्यासाठी महापालिका दरवर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये त्याबाबत तरतुद करुन त्यावर खर्च करते. परंतू काहींकडून मनपाने संगोपन केलेले वृक्षांची नासधूस करुन सदर कामामध्ये अडथळा आणण्याचे काम करित असून यामध्ये होर्डिंग धारकांचासुद्धा समावेश असल्याने मनपा प्रशासनाकडून ७ होर्डिंग धारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून देण्यात आली.

अनधिकृतरित्या वृक्षांची छाटणी केल्यास आता होणार कायदेशीर कारवाई…
याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, होर्डिंग, जाहिरात फलक धारकांनी आपल्या फलकांसमोरील वृक्षांची छाटणी किंवा तोडणी अनधिकृतरित्या करु नये. महापालिकेच्या परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन व नियंत्रण नियमानुसार जाहिरात फलक धारकाचा परवाना रद्द करुन जाहिरातदाराविरोधामध्येसुध्दा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून मंगळवार, १६ जानेवारी रोजी चिखली परिसरामध्ये अनधिकृतरित्या वृक्ष तोडणी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

वृक्षतोड करण्याऱ्या 8 होर्डिंग धारकांवर गुन्हा दाखल…
अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी आतापर्यंत ८ होर्डिंग धारकांवर पोलिसांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी ९ कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याबाबत पत्रव्यवहारसुध्दा करण्यात आला असून काही प्रकरणांची तपासणी सुरू आहे. आजपर्यंत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती उद्यान वृक्ष संवर्धन विभागाने दिली.

वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने विविध प्रयत्न करुनही जाणीवपुर्वक वृक्षतोड करण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यालगत असलेले होर्डिंग दिसत नसल्यामुळे वृक्षांची संबंधित होर्डिंग धारकांकडून विनापरवाना वृक्ष छाटणी किंवा वृक्ष तोड केली जात आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विनापरवाना वृक्षतोडीबाबत नागरिकांकडून दैनंदिन सारथी वेबपोर्टलद्वारे, लेखी याबरोबरच इतर समाज माध्यमांद्वारे तक्रारी प्राप्त होत आहेत असे अतिरिक्त आयुक्त, प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.

होर्डिंग किंवा जाहिरात फलकांसाठी विनापरवाना वृक्षांची वारंवार छाटणी किंवा वृक्ष पुर्णपणे काढले जात असल्याच्या घटना शहरात घडत आहेत. या प्रकरणी महापालिकेच्या वतीने होर्डिंग मालक व जाहिरातदारांविरोधात गुन्हा दाखल करुन महाराष्ट्र राज्य (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला असून याबाबत काही प्रकरणांमध्ये पोलिसांच्या वतीने गुन्हाही दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रविकिरण घोडके, उप आयुक्त, उद्यान विभाग यांनी दिली.