महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ : आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत घेतली बैठक….

0
5

निवडणूक खर्च आणि आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांना देण्यात आली सविस्तर माहिती…

*पिंपरी, २० – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अत्यंत निर्भय, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. या प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या विविध तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती देऊन निवडणूकीसंदर्भातील प्रशासकीय सूचना देखील दिल्या.

या बैठकीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त प्रदीप जाधव तसेच शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणुकीच्या सुलभ संचलनासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय कार्यान्वित करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आणि त्यांच्या कार्यक्षेत्राबाबत सविस्तर माहिती राजकीय पक्षांना यावेळी देण्यात आली. यासोबतच अर्जांची छाननी, हरकती नोंदवणे आणि निवडणूक प्रक्रियेतील दैनंदिन कामकाजासाठी या कार्यालयांशी संपर्क साधण्याच्या पद्धतीबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. उमेदवारांना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर आवश्यक ती सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली असल्याची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, आचारसंहिता काळात कोणत्याही प्रकारचे प्रलोभन, सामाजिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य किंवा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण टाळणे आवश्यक आहे. आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते. याशिवाय, राजकीय पक्षांनी आपल्या प्रचार सभा आणि रॅलींचे नियोजन करताना आचारसंहितेच्या मर्यादेत राहूनच करावे, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) दाखल करताना उमेदवारांनी कोणतीही चूक करू नये आणि विहित नमुन्यातच सर्व माहिती सादर करावी, अशा सूचना देण्यात आल्या. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून तांत्रिक अडचणींमुळे कोणाचाही अर्ज बाद होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत सादर करावयाच्या शपथपत्रामध्ये सर्व माहिती अचूक आणि स्पष्टपणे भरणे बंधनकारक आहे. मालमत्ता, गुन्हेगारी पार्श्वभूमी, शैक्षणिक अर्हता आणि इतर देणी याबाबत संपुर्ण माहिती अचूक भरावी. शपथपत्रातील कोणताही रकाना कोरा ठेवल्यास किंवा चुकीची माहिती आढळल्यास उमेदवाराचे नामनिर्देशन रद्द होऊ शकते.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाची टक्केवारी वाढवणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांमध्ये जनजागृती करावी, विशेषतः ‘नैतिक मतदान’ आणि ‘बहुसदस्यीय मतदान’ पद्धतीबाबत मतदारांना शिक्षित करावे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी आपला हक्क बजावावा, यासाठी महापालिकेच्या वतीने ‘स्वीप’ (SVEEP) कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी विविध परवानग्या, जसे की वाहन परवाना, सभांची परवानगी आणि नाहरकत दाखल्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे. यातील अनेक सुविधा ऑनलाईन पद्धतीने देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे उमेदवारांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणे सुलभ होणार असून, त्यांना विविध कार्यालयांत फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. या सुविधेचा लाभ घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच प्रचार कार्य करावे, असे यावेळी सूचित करण्यात आले.

निवडणूक खर्चाबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी प्रचारादरम्यान होणाऱ्या प्रत्येक खर्चाची नोंद ठेवणे आणि विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे. खर्चाची मर्यादा ओलांडल्यास किंवा हिशोबात तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेबाबत आणि मतमोजणी केंद्रावर मतमोजणी प्रतिनिधींची नियुक्ती, त्यांना दिले जाणारे ओळखपत्र आणि मतमोजणी केंद्रातील प्रवेशाचे नियम याबाबत स्पष्टता देण्यात आली. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देखील यावेळी निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांनी दिली.