अमरावती, दि. १९ (पीसीबी) : आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याविरूद्ध घणाघाती वार केला आहे. ‘महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटत फिरणारे अशी राणा दाम्पत्याची ओळख आहे, अशी घनघोर शब्दात बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर वार केला आहे. यामुळे आता अमरावतीमध्ये वाद निर्माण होऊन दिवाळीआधीच राजकीय वार – प्रतिवाराचे फटाके फुटण्याची संकेत मिळत आहेत.
अमरावती येथे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली. यावेळी बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जहरी टीका केली. अमरावती शहरात दिवाळसणाचे औचित्य साधून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा दोघेही दाम्पत्य घरोघरी मोफत काही किराणा वाटत आहेत. यावरूनच बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली.
‘आधी खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटत फिरणारे काही कमी नाही आहेत. तसंच असे महाठग आणि महा-औलाद कमी आहे का? अशा कठोर शब्दात बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला.
दरम्यान, अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात यापूर्वीही अनेकदा वाक्-युद्ध रंगले आहे. रवी राणा यांनीही बच्चू कडूंनर टीका केली होती. ‘जिथे पैसा असतो, तिथे बच्चू कडू. बच्चूसाठी बाप बडा न भैय्या, सबसे बडा रुपय्या!
आपल्याला मंत्रिपद मिळायला हवे, यासाठी अडून बसणार नाही किंवा आपण गुवाहाटीला पळून जाणार नाही. मंत्रिपद मिळायचं असो किंवा नाही मिळालं तरी, मी कायम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिपाई बनून राहीन, असं म्हणत रवी राणांनी याआधीच बच्चू कडूंना डिवचले होते. तेव्हांपासूनच राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जुंपलेली दिसून येत आहे.