महागाई, बेरोजगारीकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी राहुल गांधी यांची चौकशी; काँग्रेसचे पिंपरीत आंदोलन

0
216

पिंपरी दि. १६ (पीसीबी) – देशात रोज वाढत जाणारी महागाई, बेरोजगारी याकडे दुर्लक्ष व्हावे याच उद्देशाने काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांची गेल्या तीन दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा ईडी च्या मार्फत चौकशीचा फार्स केंद्रातील भाजप सरकार करीत असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कैलास कदम यांनी केला.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी खासदार राहुल गांधी यांची केंद्रीय तपास यंत्रणा ई डी च्या दिल्लीतील कार्यालयात गेले तीन दिवस नऊ नऊ तास चौकशी करीत आहे. या विषयात काही तथ्य नाही. निव्वळ महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे याच कुटील हेतूने पुन्हा पुन्हा नॅशनल हेरॉल्ड चा विषय पुढे करीत आहे याचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले.

माजी महापौर कवीचंद भाट, माजी नगरसेवक बाबू नायर, महिला शहराध्यक्ष सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, ज्ञानेश्वर मलशेट्टी, उमेश खंदारे, ज्येष्ठ नेते के. हरिनारायण, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहीतुले तसेच बाबा बनसोडे, गौतम ओव्हाळ, पांडुरंग जगताप, अण्णा कसबे, उमेश बनसोडे, सतीश भोसले, विठ्ठल शिंदे, आकाश शिंदे, विशाल सरवदे, सौरभ शिंदे, इमरान शेख, किरण नढे, मिलिंद फडतरे, मधुसूदन ढोकळे, अर्जुन लांडगे, किरण खाजेकर, नितीन खोजेकर, जुबेर खान स्वप्निल नवले स्वप्निल बनसोडे, अबूबकर लांडगे, अनिता अधिकारी, निर्मला खैरे, छाया देसले, दिपाली भालेकर, सुप्रिया पोहरे, नंदा तुळसे, सुप्रिया कदम, भारती घाग, स्वाती शिंदे वैशाली दमवानी, आशा भोसले, शिवानी भाट, रोहित शेळके, राजाराम भोंडवे, पंकज पवार, करीम पूना आदी उपस्थित होते.

कदम म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारचा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. त्यांना तपासच करायचा असेल तर राफेल खरेदीचा तपास करावा, परदेशातून किती काळा पैसा आणला त्याचा तपास करावा अशी मागणी कदम यांनी केली. तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांची सूडबुद्धीने चौकशी केली तर पुढील काळात पिंपरी चिंचवडमध्ये कॉंग्रेसचे कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतील असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी या वेळी दिला.

माजी नगरसेवक बाबू नायर म्हणाले की, आता ई डी कडे राहुल गांधी यांचाच तपास करणे बाकी आहे काय ? गांधी घराण्याचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आणि त्यांचे चिरंजीव तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय
राजीव गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. हे गांधी कुटुंबीयांचे देशासाठी योगदान आहे. सोनिया गांधी उपचारार्थ रुग्णालयात दाखल असताना राहुल गांधी यांना तीन दिवस चौकशीच्या फेऱ्यात अडकवणे हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे हा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आहे.