महाआघाडी सरकार कोसळण्यामागचे सगळ्यात मोठे कारण…

0
284

– नितेश राणे यांचा गंभीर आरोप, शिवसेनेत खळबळ

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – महाआघाडी सरकार कोसळण्याचे महत्वाचे कारण हे उध्दव ठाकरे यांचा भाचा म्हणजे वरुण सरदेसाईच असल्याचा आरोप, नितेश राणे यांनी केला आहे. गेल्या तीन आठवड्यापासून महाआघाडी सरकार गटांगळ्या खात असताना वरुण सरदेसाई कुठेही दिसत नसल्याने संशयाचे धूके दाट झाले आहे.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी मला दगा दिला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. याच विधानावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांचे भाचे वरुण सरदेसाई यांचं नाव न घेता त्यांच्यावरही गंभीर आरोप लावले आहेत.

नितेश राणे यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, “उद्धव ठाकरे म्हणतात की, मला शिंदे साहेबांसोबत गेलेल्या आमदारांनी दगा दिला. मी त्यांना एवढंच सांगेल की, दगा नेमका कुणी दिला? हे खऱ्या अर्थाने पाहायचं असेल, तर त्यांनी आपल्या घरातून सुरुवात करायला हवी. आपल्या अवतीभवती कधीही निवडून न येणारे लोक आहेत. त्यांनीच खऱ्या अर्थाने दगा दिलाय, हे उद्धवजींना कळलंच नाही,” असं नितेश राणे म्हणाले.

त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की, “दगा कुणी दिला हे पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या भाच्यापासून सुरुवात करावी. ज्याने अडीच वर्षाच्या तुमच्या कारकीर्दीमध्ये तुमची बदनामी केली, सत्तेचा गैरवापर केला. लोकांच्या घरापर्यंत जाणं, लोकांच्या घरासमोर धिंगाणा घालणं आणि भ्रष्टाचार करणं या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वत:च्या भाच्याने केल्या आहेत. हेच तुम्हाला अडीच वर्षामध्ये कळत नसल्यामुळे आजची परिस्थिती तुमच्यावर आली आहे.” असंही राणे म्हणाले.

वरुण सरदेसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पूत्र आहेत. म्हणजेच ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. वरुण सरदेसाई यांच्याकडे शिवसेनेच्या युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे. तसंच यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे.