महाआघाडी सरकार अल्पमतात, पाठिंबा काढल्याचे पत्र शिंदे गट आजच देणार

0
229

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – भाजापने कोअर कमिटीची तातडीची बैठक निमंत्रीत केली असून आपल्या आमदारांना महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नका असे सक्त आदेश दिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना आजच बंडखोर आमदारांकडून सरकारचा पाठिंबा काढण्याबाबत पत्र दिले जाणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सरकार स्थापनेचा दावा भाजपा करणार असल्याचे सांगण्यात आले. नविन सरकार आठवड्याच्या आत स्थापन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिंदे गटाने न्यायालयाच्या निकालाचे जल्लोषात स्वागत केले असून भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

शिवसेनेत बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना सर्वोच्च न्यायलयाने नोटीस बजावली आहे. आपलं म्हणणं मांडण्यासाठी तिन्ही पक्षांना वेळ देण्यात आला आहे. पाच दिवसांत त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने ११ जुलैची असेल असं स्पष्ट केलं आहे. या सुनावणीदरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात बंडखोर आमदारांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला नसल्याचं म्हटलंय. त्यामुळेच ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यातच आता ११ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमत चाचणी होणार की नाही यासंदर्भातील संभ्रम कायम आहे. असं असलं तरी न्यायलयाने यासंदर्भात शिवसेनेला आणि पर्यायाने ठाकरे सरकारला काहीसा दिलासा देणार निर्णय दिलाय.

परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे हवी आहे असे निर्देश दिलेत. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आम्ही निकाल देऊ असं न्यायलयाने सांगितलं आहे. आमदारांना १२ जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे १२ जुलैपर्यंत आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. हा शिंदे गटासाठी दिलासा मानला जात आहे.