महाआघाडीपासून नितीश कुमार फारकत घेणार, भाजप सोबत जाणार

0
134

पाटणा, दि. २७ (पीसीबी) – बिहारची राजधानी पाटनामध्ये कडाक्याच्या थंडीत राजकीय तापमानाचा पार अचानक वाढला आहे. इंडिया आघाडी आणि बिहारमधील महाआघाडीपासून नितीश कुमार फारकत घेणार आहेत का? बुधवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहताना नितीश कुमार यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती. नितीशकुमार यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी, ते म्हणाले होते की कर्पूरी ठाकूर यांनी कधीच त्यांच्या कुटुंबाची बाजू घेतली नाही पण आजकाल लोक आपल्या कुटुंबाला पुढे रेटण्यात धन्यता मानत आहेत.

नितीश कुमार यांची टिप्पणी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांवर असल्याचं बोललं जातंय. भाजप सरकारने दोन दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता आणि त्याबद्दल नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते. यानंतर गुरुवारी सकाळी बातमी आली की, 30 जानेवारीला बिहारच्या पूर्णियामध्ये येणाऱ्या राहुल गांधींच्या रॅलीमध्ये नितीश कुमार सहभागी होणार नाहीत.

भारत जोडो न्याय यात्रेचा भाग म्हणून राहुल गांधी पूर्णियाला जाणार आहेत. याआधी ‘जदयू’ने नितीशकुमार हे राजदच्या नेत्यांसोबत यात्रेला उपस्थित राहणार असल्याचे संकेत दिले होते.
‘जदयू’चे ज्येष्ठ नेते विजय कुमार चौधरी हे नितीश कुमार यात्रेत सहभागी होणार नसल्याबाबत म्हणाले की, “महाआघाडीचे सर्व नेते यात्रेला उपस्थित असलेच पाहिजेत असं नाही.”
राजकीय घडामोडीनंतर नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करणार का याविषयीच्या चर्चांना उधाण आलंय. ‘जदयू’चे प्रवक्ते केसी त्यागी यांनी म्हटलंय की, नितीश कुमार यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर कर्पूरी ठाकूर यांची प्रशंसा केलेली, त्यांचं वक्तव्य लालू प्रसाद यादव यांना उद्देशून नव्हतं. नितीश कुमार ‘एनडीए’मध्ये परतण्याच्या चर्चांबाबत बिहारमधील भाजप नेत्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, ही पक्षासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. यामुळे बिहारमधील भाजपचं नैतिक मनोबल वाढण्यास मदत होईलच, शिवाय इंडिया आघाडी राष्ट्रीय स्तरावर कमकुवत होईल.

बिहार भाजपच्या नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘द हिंदू’ला सांगितलं की, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तरच भाजप त्यांना सोबत घेईल. अशा परिस्थितीत विधानसभा बरखास्त करणं हा एकच पर्याय असू शकतो. के सी त्यागी यांनी लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनाही लहान मुलांनी मोठ्यांच्या चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.